शितल बि-हाडे आणि शंकरराव चव्हाण पब्लिक स्कूलमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

अर्धापूर (प्रतिनिधी) – मानसिक त्रासाला कंटाळून एका ४२ वर्षीय व्यक्तीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक शिवारात घडली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीहरी प्रभाकर बि-हाडे (वय ४२, रा. कामठा बुद्रुक, ता. अर्धापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून ते २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान कामठा बुद्रुक शिवारातील एका विहिरीत उडी मारून त्यांनी आपले जीवन संपविले. या प्रकरणातील फिर्यादीनुसार, शितल श्रीहरी बिऱ्हाडे (वय ३५, रा. कामठा बुद्रुक) तसेच शंकरराव चव्हाण पब्लिक स्कूलमधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून श्रीहरी बि-हाडे यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून आणि मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सुनंदाबाई प्रभाकर बि-हाडे (वय ६०, रा. पाटणूर, ता. अर्धापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत करीत आहेत. आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!