हायवामध्ये पाच ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक; वाहनमालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुदखेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत मुदखेड पोलिसांनी वासरी रोडवर विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर कारवाई करून तब्बल ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मुदखेड पोलिसांना मौजे वासरी रोडवरून वाहनांमधून अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत एमएच-२६ सीएच-२४१८ क्रमांकाचा हायवा अडवून तपासणी केली. या हायवामध्ये अंदाजे पाच ब्रास रेती आढळून आली. संबंधितांकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी व कागदपत्रांची मागणी केली असता, वाहतूक अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून अंदाजे ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची पाच ब्रास रेती असा एकूण ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी १) शिवम ऊर्फ शिओम नागोराव वाघमारे (वय २१, रा. बळीरामपूर, नांदेड) आणि २) संतोष सुदाम येवले (रा. जानापुरी, ता. लोहा, हायवा मालक) यांच्याविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४८(७)(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुदखेड पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक भोकर अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड, पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे, राजेश नंद, सुरेश जाधव आणि पोलीस अंमलदार रमेश पुणेबोईनवाड यांनी पार पाडली. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे. तसेच अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!