रब्बी सिंचनासाठी पाणी मिळणार नाही : शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर रब्बी पिकांची पेरणी करू नये; जलसंपदा विभागाचे आवाहन नांदेड – अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा सन 2026-27 या वर्षासाठी 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे चालू वर्षात प्रकल्पाच्या कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहून रब्बी पिकांची पेरणी किंवा लागवड करू नये, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने 5 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार विष्णुपुरी प्रकल्पातील सर्व पाणीसाठ्यातून उपलब्ध होणारे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी नांदेड महानगरपालिका तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी या प्रकल्पातील पाणी आरक्षित ठेवले आहे. या निर्णयामुळे सन 2026-27 मध्ये विष्णुपुरी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडणे शक्य होणार नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कालव्याद्वारे प्रवाही पाणी उपलब्ध होईल, या अपेक्षेने रब्बी पिकांची पेरणी, लागवड अथवा अन्य पीक उत्पादनाची कामे करू नयेत. कालव्याच्या पाण्याच्या अपेक्षेने पीक पेरणी किंवा लागवड केल्यास होणाऱ्या संभाव्य नुकसानीची जबाबदारी जलसंपदा विभागाची राहणार नाही, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड यांनी सार्वजनिक निवेदनाद्वारे केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 25 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation परभणीत अवैध वाळू उपशावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई! अमित शाह लखनऊत अन् शहरात दनादन गोळ्या! ३ जणांचा निघृण खून; उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्था कोलमडली