80 लाखांचा मुद्देमाल जप्त; चार तराफे, हायवा, टिप्पर आणि जेसीबीचा समावेश परभणी (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे वझुर शिवारात करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 79 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष पथकाला कारवाईसाठी वझुर शिवारात पाठविले होते. दिनांक 29 ऑक्टोबर 2026 रोजी पथकाने वझुर शिवारातील वाळू धक्क्यावर छापा टाकला. यावेळी इंजिन बोटीच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळूचा उपसा केला जात असल्याचे, तसेच उपसा केलेली वाळू तराफ्यांच्या मदतीने नदीकिनारी आणली जात असल्याचे आढळून आले. या कारवाईत वाळूने भरलेले चार तराफे, एक हायवा, एक टिप्पर, एक जेसीबी मशीन आणि नदीपात्रातून काढून साठवून ठेवलेली 30 ब्रास वाळू असा एकूण 79 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 705/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 48(7) व 48(8) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाचा सहभाग या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. अवैध व्यवसायांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून खबर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. 9150100100 हा या हेल्पलाइनचा मोबाईल क्रमांक असून, नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती या क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 29 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation यमुनेत डुबकी की पोलिटीकल ड्रामा? मनोज तिवारींचा स्वीमिंग व्हिडिओ कसा उघडा पडला! विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित