रोख रकमेसह दोन मोबाईल आणि मोटारसायकल असा ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एसडीपीओ माहूर यांच्या पथकाची कारवाई माहूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत माहूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने मांडवी येथे सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम, दोन मोबाईल आणि एक मोटारसायकल असा एकूण ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांचे विशेष पथक अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी गस्तीवर होते. यावेळी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे उमरी येथे असताना गुप्त बातमीदारामार्फत मांडवी बसस्थानकाजवळील श्रीनिवास फर्टिलायझरच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत काही जण पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पळून गेले; मात्र तिघांना पोलिसांनी पंचांसमक्ष ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये १) संतोष नारायण कुलवार (वय ४२, रा. मांडवी, ता. किनवट), २) आकाश सोमा मडावी (वय २९, रा. राजुरवाडी, जि. आदिलाबाद, तेलंगणा) आणि ३) शेख गौस शेख अजीज (वय ४९, रा. मांडवी, ता. किनवट) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून ३ हजार ४०० रुपये रोख, अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, डिस्कव्हर कंपनीची मोटारसायकल व इतर जुगार साहित्य असा एकूण ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्ता सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२०/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार दत्ता सोनटक्के व कांबळे यांच्या पथकाने केली. अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 77 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोन वाहनांमध्ये अडकलेला मृतदेह अथक प्रयत्नांनंतर बाहेर;