नांदेड(प्रतिनिधी)-कासरखेडा येथे जमीनीला कुंपण करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये राडा झाला. परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक तक्रार ऍट्रॉसिटी कायद्याची आहे आणि एक तक्रार भारतीय दंड संहितेच्या कलम 307 प्रमाणे आहे. घटनेतील बरेच जण आज दवाखान्यात आहेत.
दि.13 मे च्या दुपारी 11 वाजेच्यासुमारास कासारखेडा येथील दिपक इंद्रजित हिंगोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वडीलांच्या नावे कासरखेडा येथे गट क्रमांक 89 मध्ये शेती आहे. या शेतातील केळीच्या पिकाला जनावरे आणि डुकरे खराब करत असल्यामुळे त्यांनी येथे लोखंडी जाळीचे कुंपन आणि लाकडे लावली आहेत. त्या दिवशी त्यांच्या शेजारी शेत असलेले जगेंद्रसिंघ चरणसिंघ बुंगई, धरमसिंघ चरणसिंघ बुंगई, संदीपसिंघ जगेंद्रसिंघ बुंगई, धनवंतसिंघ जगेंद्रसिंघ बुंगई यांनी दिपक हिंगोलेच्या शेतात येवून लावलेली जाळीला कुड वाकडे करून पाडून टाकले. याबद्दल जाब विचारला असतांना त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्याकडील बरछीने दिपकच्या उजव्या पायात मारहाण करून जबर दुखापत केली. त्यानंतर भांडणाचा ऐवज ऐून राजकुमार इंद्रजित हिंगोले आणि पुतण्या कार्तिक राजकुमार हिंगोले हे दोेघे भांडण सोडविण्यासाठी आले असतांना त्यांनाही धार-धार शस्त्राने मारहाण करण्यात आली. या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 324, 506, 34 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1)(आर), 3(1)(एस) प्रमाणे गुन्हा क्रमांक 221/2024 दाखल केला आहे. हा गुन्हा ऍट्रॉसिटीचा असल्या कारणाने नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन हे तपास करणार आहेत.
दुसऱ्या एका तक्रारीत चतरुसिंघ जगेंद्रसिंघ बुंगई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 मेच्या दुपारी 11 वाजेदरम्यान त्यांच्या शेतात येणाऱ्या कॅनॅलचे पाणी, विद्युत डी.पी. आणि इतर लहान सहान कारणावरून झालेल्या भांडणातून राजू इंद्रजीत हिंगोले,दीपक हिंगोले, दिनेश हिंगोले आणि कार्तिक हिंगोले यांनी काठीने आणि तिक्ष्ण हत्याऱ्याने डोळ्यात मारले, डोळ्यात माथी टाकली, पाठीत गंभीर जखम करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 226/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम हे करणार आहेत.