नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी एक दिवसासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही हवामानाची स्थिती लक्षात घेऊन सतर्क राहावे आणि वीज, वादळी वारे व पावसाच्या कालावधीत सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. विजा चमकत असताना ही खबरदारी घ्या विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यास अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे. मोकळ्या जागेत असताना जवळपास सुरक्षित इमारत उपलब्ध नसल्यास सखल जागेचा आश्रय घ्यावा आणि गुडघ्यात डोके घालून सुरक्षित स्थितीत बसावे. घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावीत. तारांचे कुंपण, विजेचे खांब आणि अन्य लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात असल्यास तात्काळ पाण्याबाहेर यावे. वीज पडण्याचा धोका असताना हे टाळा घरातील लँडलाइन दूरध्वनीचा वापर करू नये. शॉवरखाली अंघोळ करू नये तसेच बेसिनचे नळ, पाण्याच्या पाइपलाइनला स्पर्श करू नये. वीज चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी संरचनेच्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाखाली आसरा घेऊ नये. धातूच्या उंच मनोऱ्यांजवळ उभे राहू नये. घरात असताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये. अशा ठिकाणी उभे राहणेही धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामानविषयक सूचनांकडे लक्ष द्यावे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 160 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अमित शाहंवरील विधानावरून राहुल गांधी निर्दोष! व्यथित व्यक्तीच नाही ठरला भाजप नेता; सुल्तानपूर कोर्टाचा दणका! सक्तीच्या वसुलीविरोधात आष्टीतील महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव