ईजळी शिवारात अंदर-बाहर जुगार सुरू असताना कारवाई; ३ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुदखेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मुदखेड पोलिसांनी ईजळी शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत अंदर-बाहर जुगार खेळणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार मोबाईल फोन, चार मोटारसायकली, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुदखेड पोलिसांना ईजळी रेल्वे रुळाजवळील शेतशिवारातील मोकळ्या जागेत काही जण बेकायदेशीररीत्या ‘अंदर-बाहर’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी जुगार सुरू असल्याचे आढळून आले.

या कारवाईत मोहम्मद सलमान मोहम्मद युनूस (वय ३०, रा. नवी आबादी, मुदखेड), कपिल सोपान हटकर (वय २८, रा. ईजळी), गजानन उमराव कळणे (वय ३९, रा. सरेगाव, ता. मुदखेड), कृष्णा गणेश पवार (वय २१, रा. नरसी निवघा, ता. मुदखेड), रामप्रसाद नारायण मुचकुलवाड (वय २७, रा. मैडका, ता. मुदखेड), अरविंद बाबाराव मुंगल (वय २८, रा. ईजळी), गंगाधर लोंढे (रा. बारड), राष्ट्रपाल दीगांबर हटकर (रा. ईजळी, ता. मुदखेड) आणि बाळू पवार (रा. निवघा, ता. मुदखेड) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, एमएच-२६-सीएल-१११३, एमएच-२६-बीजे-८८३९, एमएच-२६-एएन-६००५ क्रमांकाच्या तीन मोटारसायकली आणि एक विनानंबर मोटारसायकल, अशा वाहनांची अंदाजे २ लाख ७० हजार रुपये किंमत, तसेच ७ हजार ५०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील आणि भोकरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राजेश नंद, आकाश सरोदे, सुरेश जाधव तसेच मुदखेड पोलिस ठाण्यातील पोलीस अंमलदार भिसे, पुणेबोईनवाड आणि होमगार्ड यांनी या कारवाईत सहभाग घेतला. जिल्ह्यात अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!