देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. देगलूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आंतरजिल्हा दुचाकी चोरी प्रकरणात दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण २७ चोरीच्या मोटारसायकली, किंमत १४ लाख १५ हजार रुपये, जप्त केल्या आहेत. दोन टप्प्यांत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाहनचोरांच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(३) अंतर्गत वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सुरुवातीला शिवकुमार हनुमान कुहाडे (वय २८, रा. नायगाव, जि. नांदेड) याला अटक केली. त्याच्याकडून मागील आठवड्यात १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणातील दुसरा आरोपी तुकाराम ऊर्फ बाळू गंगाधर गिरी (वय २५, रा. टाकळगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) हा खानापूर फाटा, देगलूर येथे चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी आला असताना अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. त्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सतत ठिकाणे बदलत होता. तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी देगलूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांची मदत घेतली. पुणे तसेच इतर संभाव्य ठिकाणी तपास पथकाने शोधमोहीम राबवून अखेर आरोपी बाळू गिरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.आरोपीने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या तसेच विक्री केलेल्या आणखी १७ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या. या दुचाकींची किंमत १० लाख ५ हजार रुपये आहे. आरोपी स्वतःच्या किंवा नातेवाइकांच्या मालकीच्या असल्याचे भासवून चोरीच्या मोटारसायकली कमी किमतीत विकत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन टप्प्यांत २७ दुचाकी जप्त या कारवाईत पहिल्या टप्प्यात ४ लाख १० हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली, तर दुसऱ्या टप्प्यात १० लाख ५ हजार रुपये किमतीच्या १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण २७ मोटारसायकलींचा १४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या वाहनचोरी प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट आणि परिक्षेत्रीय पोलीस उपअधीक्षक तथा देगलूरचे प्रभारी अधिकारी वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिंदे, पोलीस अंमलदार अशोक घुमे, नामदेव शिरोळे, ओमप्रकाश डिडेवार, मुजीद पठाण, होमगार्ड संभाजी कोकणे, मनोज वझरगेकर, शुभम कोरेकर तसेच सायबर सेलचे राज सिटीकर आणि दीपक ओढणे यांनी सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेत ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 106 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कांंकाडी शिवारात सोयाबीन पिकाला अज्ञात व्यक्तीकडून आग; २ लाख ४० हजारांचे नुकसान