· प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भागात पंचनामे सुरु
नांदेड :-काल 12 मे रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट व अवेळी पाऊस झाला आहे. यामध्ये वीज कोसळून एक जण मृत्युमुखी पडला असून वेगवेगळ्या घटनेत १८ जनावरे दगावली आहेत.
यात नांदेड भोकर, किनवट, हदगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, उमरी, नायगांव, कंधार तालुक्यात अवेळी पाऊस पडला असून इतर काही तालुक्यांत किरकोळ पाऊस पडला आहे. काल झालेल्या वादळी वारे व अवेळी पावसामुळे जिल्ह्यात एक जण विज पडून ठार तर अकरा जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने तालुक्या प्रशासनाला झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पंचनाम्याची कार्यवाही सुरु आहे.
हदगाव तालुक्यातील मौ. धानोरा येथील रामराव गंगाराम वानखेडे अंदाजे वय 75 वर्ष हे 12 मे रोजी वीज पडून मयत झाले आहेत. तसेच मुखेड तालुक्यातील मौ. पाळा येथील हाणीसाबी बाबु सय्यद ही महिला वीज पडून किरकोळ जखमी झाली आहे. जिल्ह्यात अवकाळी पाऊस, विज पडल्यामुळे एकूण 18 जनावरे मयत झाली असून त्यापैकी 3 लहान दुधाळ जनावरे , 7 मोठी दुधाळ जनावरे, 2 लहान ओढकाम करणारी जनावरे तर 6 मोठी ओढकाम करणारी जनावरे यांचा समावेश आहे. मुखेड येथे 3 व किनवट तालुक्यात 4 कच्च्या घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.