नांदेड(प्रतिनिधी)-श्री आद्य शंकराचार्य जयंती दिनी अर्थात 12 मे रोजीची पहाट होण्याअगोदर गुजरातच्या सुरत शहरातील गुन्हे शोध पथकाने नांदेड पोलीसांशी संपर्क साधून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात नरसीतून एका 20 वर्षीय युवकाला अटक केली. सनातन संघाचे अध्यक्ष आणि काही पत्रकारांचा खून करण्याचा कट केला असा आरोप नरसीतील शेख शकील या युवकावर आहे. सुरत पोलीस त्याला घेवून पुन्हा रवाना झाले आहेत.
सुरत पोलीस आयुक्तालयात भारतीय दंड संहितेच्या कलम 154(अ), 468, 467, 471, 120(ब) तसेच सह कलम 66(ड), 67, 66(अ) तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 039/2024 दाखल झाला होता. सुरत पोलीसांनी मिळवलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये राहणारे वकास व सरफराज डोगर हे दोघे जैशबाबा राजपूत नावाचा व्हाटसऍप गु्रप चालवत होते. या व्हाटसऍप गु्रपमध्ये सुरत येथील साहेल टिमोल, बिहार येथील शहनाज हे सामिल आहेत. सुरत पोलीसांना सापडलेल्या व्हाटसऍप चॅटनुसार सनातन संघाचे अध्यक्ष आणि काही पत्रकारांना मारण्यासाठी या गु्रपमध्ये चर्चा चालायची. त्यात नांदेड जिल्ह्यातील नरसी गावचा शेख शकील शेख सत्तार हा 20 वर्षीय युवक सामील आहे. ही माहिती सुरत पोलीसांनी हस्तगत केली.
त्यानंतर सुरत शहर गुन्हा शाखा येथील अधिकारी व पोलीस अंमलदार नांदेडला आले आणि त्यांनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संपर्क साधला. घडलेल्या प्रकाराची माहिती श्रीकृष्ण कोकाटे यांनी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना दिली. त्यानंतर सुरत पोलीसांसोबत सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार बिरादार, मस्के आदींना पाठविले. रविवारची पहाट होण्याअगोदरच नरसी गावात सुरत आणि नांदेड पोलीस पथकाने संयुक्त मोहिमेत शेख शकील शेख सत्तार (20) या युवकाला ताब्यात घेतले आणि रविवारी दुपारनंतर सुरत पोलीस शेख शकीलला घेवून पुन्हा परतीच्या प्रवासावर निघालेले आहेत.