रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळला परतताना काळाचा घाला; प्रखर प्रकाशामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज, घाटातील संरक्षक कठड्यांचा प्रश्न ऐरणीवर. माहूर (प्रतिनिधी) -श्रीक्षेत्र माहूर गडावर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असतानाच, रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला माहूर घाटात भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मॅक्सिमो जितो टेम्पो सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. शुक्रवार, दि. १६ रोजी पहाटे पाचच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर ही दुर्घटना घडली. या अपघातात राहुल ठाकरे, प्रीतम प्रधान आणि बाबाराव टेकाम या तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दर्शन आटोपून परतताना दुर्घटना मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील फर्निचरच्या दुकानात काम करणारे सहा कामगार एमएच २९ बीई ६८५९ क्रमांकाच्या मॅक्सिमो जितो टेम्पोने बुधवारी, दि. १५ रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान माहूरकडे रवाना झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास माहूर येथे पोहोचल्यानंतर त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या या कामगारांच्या वाहनाला घाटातील पहिल्याच धोकादायक वळणावर अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशाचा चालकाच्या डोळ्यांवर परिणाम झाला. त्याचवेळी समोरील वाहन विरुद्ध दिशेने आल्याने टेम्पो बाजूला घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट खोल दरीत कोसळला. या ठिकाणी संरक्षक कठडा किंवा मजबूत संरक्षक भिंत नसल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याची चर्चा आहे. तिघांचा मृत्यू; जखमींवर उपचार या दुर्घटनेत राहुल ठाकरे आणि प्रीतम प्रधान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या बाबाराव टेकाम यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दत्तू मेश्राम, प्रतीक आर. के. आणि यशवंत पाटील हे जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बिपिन बाभळे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. दरीत कोसळताना वाहन दगडांवर आदळल्याने तसेच दगड आणि वाहन अंगावर पडल्याने काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. पोलिसांसह स्थानिकांनी राबविली बचावमोहीम अपघाताची माहिती मिळताच भाविकांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि पोलीस कर्मचारी पवन राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्यात आले. दरीत पडलेले मृतदेह बाहेर काढणे हे मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक चोपडे यांनी पत्रकार इलियास बावाणी आणि पत्रकार गोपाल चव्हाण यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही केली. दरम्यान, शारदा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर श्रीनिवास यांनी तातडीने क्रेन उपलब्ध करून दिली. त्यामुळे दरीत कोसळलेला टेम्पो बाहेर काढणे शक्य झाले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत दिली. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. या मदतकार्यात एस. बी. बोथिंगे, दत्ता पालटवाड, एस. कुंठेकर, आर. श्रीमंगले, पी. आर. जुडे, जी. आर. भोपाळे, अमृता कऱ्हाळे आणि गणेश धुळगंडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. धोकादायक वळणांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, पोलीस हवालदार सत्यमल मडावी, पोलीस कर्मचारी संघरत्न सोनसळे व पवन राऊत तसेच होमगार्ड एस. पी. भगत आणि मुरकुटे पुढील तपास करीत आहेत. नवरात्री उत्सवामुळे माहूर गडावर भाविकांची मोठी वर्दळ असताना घडलेल्या या दुर्घटनेने घाट रस्त्यावर सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. धोकादायक वळणांवर मजबूत संरक्षक कठडे, संरक्षक भिंती, दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांना स्पष्ट दृश्य मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आहेत का, याची संबंधित विभागाने तपासणी करणे गरजेचे आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 311 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इंग्रजांच्या काळातही जे घडले नाही ते आज घडतेय: तिरंग्यावरच पोलिसांचा पहारा आणि उघडे पडलेले राजकारण!