विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 17 व 18 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. बाहेर असताना जवळपास सुरक्षित इमारत नसल्यास सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे बंद करावीत. विजेचे खांब, तारांचे कुंपण आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात उभे असल्यास तातडीने पाण्याबाहेर पडावे. या गोष्टी कटाक्षाने टाळा विजांच्या कडकडाटादरम्यान घरातील दूरध्वनीचा वापर, शॉवरखाली अंघोळ करणे, नळ किंवा पाण्याच्या पाइपलाइनला स्पर्श करणे तसेच विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. वादळी वाऱ्यांसह वीज चमकत असताना धातूंच्या आधारावर उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नये. उंच झाडाखाली किंवा उंच धातूच्या मनोऱ्याजवळ थांबू नये. घरात असताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहणेही धोकादायक असल्याने ते टाळावे. हवामानातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. शेतकरी, शेतमजूर, प्रवासी आणि मोकळ्या जागेत काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 94 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या रजिस्ट्री कार्यालयात शिवीगाळ करून गोंधळ! नांदेड शहर मंडळात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान उत्साहात संपन्न