जिंतूरच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील रजिस्ट्री कार्यालयात अश्लील शिवीगाळ करीत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी रजिस्ट्री कार्यालयातील वरिष्ठ लिपिक तथा सब-रजिस्ट्रार विठ्ठल भोसले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित कर्मचारी शिवराज माणिकराव येवते याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर येथील रजिस्ट्री कार्यालयातील कर्मचारी शिवराज माणिकराव येवते हा नांदेड येथील रजिस्ट्री कार्यालयात आला असताना त्याने गोंधळ घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले. कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच स्टॅम्प विक्रेता व नोटरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे. मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही निष्फळ कार्यालयात सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी स्टॅम्प विक्रेता आणि नोटरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित व्यक्तीने त्यांच्याशीही अरेरावी करीत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर या घटनेची चर्चा सुरू झाली. शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल या घटनेनंतर सब-रजिस्ट्रार विठ्ठल भोसले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ३५१ व ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित कर्मचारी शिवराज येवते याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सब-रजिस्ट्रार विठ्ठल भोसले यांनी केली आहे. शासकीय कार्यालयात अशा प्रकारे गोंधळ घालणे आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे आरोप गंभीर मानले जात आहेत. आता पोलीस तपासात या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी काय आहे, हे स्पष्ट होणार असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध पुढे कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-15-at-14.40.56.mp4 Kanthak Suryatal Post Views: 224 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आपत्तीच्या काळात जीव वाचविण्यासाठी सीपीआरचे प्रशिक्षण महत्त्वाचे;उष्णतेपासून बचावाचेही मार्गदर्शन