तामसा (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत तामसा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नांदेड रोडवरील बाळू हरण यांच्या मुरूमाच्या खदानीत सुरू असलेल्या ‘अंदर-बाहर’ जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत पाच मोबाईल, चार मोटारसायकली, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ६४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान १० ऑक्टोबर २०२६ रोजी तामसा पोलिसांना नांदेड रोडवरील बाळू हरण यांच्या मुरूमाच्या खदानीत काही जण ‘अंदर-बाहर’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत रामविजय देविदास जावळे (वय २८, रा. रावणगाव), शेख समीर शेख खालिद (वय २२, रा. शेतमजूरवाडी, तामसा), संदीप परमेश्वर शेटे (वय ४२, रा. तामसा), राजू उमराव कदम (वय ३४, रा. तामसा), शेख तौफीक शेख फारुख (वय २५, रा. तामसा) आणि गजानन ऊर्फ लुटो भोजराज (रा. तामसा) हे सहा जण आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच मोबाईल फोन, चार मोटारसायकली, १ हजार ७६० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालात मोबाईलची किंमत ३३ हजार रुपये, तर चार मोटारसायकलींची अंदाजे किंमत २ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१३/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव खेडकर तसेच पोलीस अंमलदार खान, कबले, लोखंडे आणि होमगार्ड यांनी केली.

अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरूच

जिल्ह्यात अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे नांदेड जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!