हिंगोली(प्रतिनिधी)-सन 2020 मध्ये 30 हजार रुपयांची लाच घेवून हे प्रकरण न्यायालयात अद्याप सुरू असतांना तहसील कार्यालय औंढा येथील मंडळ अधिकाऱ्याने पुन्हा 20 हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर हिंगोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला गजाआड केले आहे.
एका तक्रारदाराने 8 मे रोजी हिंगोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांनी मौजे हिवरा जाटू येथील शेतजमीन देऊबाई मधुकर काशिदे यांच्याकडून सन 2011 मध्ये खरेदी केली होती. त्यावेळी 7/12 उताऱ्यावर तक्रारदाराच्या पत्नीचे नाव फेरफार करून नोंदविण्यात आले होते. सन 2018 मध्ये देऊबाई काशिदेने सावकारी कार्यालय औंढा येथे या जमीन खरेदीबाबत तक्रार दिली. त्या प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागला. पुढे हे प्रकरण अपील दर अपील करत पुढे चालत राहिले. सध्या औंढा दिवाणी न्यायालयात या जमीन खरेदीबाबत दिवाणी वाद सुरू आहे. या बाबत तहसील कार्यालय औंढा येथील वर्ग-3 या पदातील मंडळ अधिकारी उत्तम रत्नराव डाखोरे (54) यांनी तक्रारदाराला तुझ्या पत्नीचे नाव 7/12 उताऱ्यावर कायम ठेवण्याासाठी 20 हजार लाचेची मागणी पंचासमक्ष केली आणि 9 मे रोजी लाच स्विकारली. या प्रकरणातील लाचखोर मंडाळाधिकारी उत्तम ाखोरे विरुध्द तहसील कार्यालय कळमनुरी येथे तो आणि एक तलाठी यांनी वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आणि पुढील महिनाभर वाळू वाहतुक करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच स्विकारली होती. त्याबाबत कळमनुरी पोलीस ठाण्यात सुध्दा गुन्हा क्रमाक 193/2020 दाखल झाला होता. ते प्रकरण अद्याप न्याय प्रविष्ठ आहे. 9 मे रोजी मंडळ अधिकारी उत्तम डाखोरेने हिंगोली येथे लाच स्विकारली होती. त्याबाबत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात हिंगोलीचे पोलीस उपअधिक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक विनायक जाधव आणि त्यांच्या पथकाने लाचखोर उत्तम डाखोरेला अटक करण्याची प्रक्रिया पुर्ण केली.
हिंगोली लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्याावतीने कोणी खाजगी माणुस(एजंट) याने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्क व्यतिरिक्त अन्य रक्कम अर्थात लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय हिंगोली येथे संपर्क साधावा. लाच संदर्भाची माहिती पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांचा मोबाईल क्रमांक 9623999944, पोलीस उपअधिक्षक अनिल कटके यांचा मोबाईल क्रमांक 9870221379, हिंगोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा दुरध्वनी क्रमांक 02456-223055 तसेच टोल फ्रि क्रमांक 1064 वर माहिती देता येईल.