नांदेड (प्रतिनिधी):- जमीन विक्रीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड शहरातील पाच जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल २७ लाख ५० हजार रुपये रोख आणि ४ लाख रुपयांचा बँक व्यवहार, अशी एकूण ३१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम हडपल्याची तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गायकवाड, सुनीता गिरी, राजकुमार भालेराव, बंटी ऊर्फ विशाल गायकवाड आणि कमलाकर गोविंदराव कदम यांनी संगनमत करून फिर्यादीसोबत जमीन व्यवहार केला. मौजे मेंढला खुर्द, ता. अर्धापूर येथील २१ गुंठे जमीन विक्रीपूर्वी अनेकांना सोडचिठ्ठी करून दिल्याचे भासवून, त्यानंतर त्याच जमिनीचा पुन्हा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या व्यवहारात आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीकडून २७ लाख ५० हजार रुपये रोख, तसेच ४ लाख रुपये बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा बाळापूर येथून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, व्यवहारानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी फिर्यादी मधुकर नागोराव पंतगे (वय ६५, रा. विशाल नगर, वाडी बु., नांदेड) यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७९/२०२५ दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(५) आणि ६१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. या जमीन व्यवहारामागील संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!