नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दि. ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान तालुका क्रीडा संकुल, मूर्तिजापूर येथे राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मास्टर तायक्वांदो मार्शल आर्ट स्कूल, नांदेडच्या तब्बल ११ खेळाडूंची लातूर विभागातून निवड झाली आहे.

लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नांदेडच्या खेळाडूंमध्ये अर्जुन मतदार (२८ किलो), शेख आहात (४४ किलो), कृष्णा तीर मतदार (४१ किलो), श्रीहरी सातवणकर (५९ किलो), यश जाधव (५५ किलो), शहजाद खान (७४ किलो), प्रथमेश चिकटवाड (५१ किलो), लक्ष्मण सूर्यवंशी (४६ किलो) यांचा समावेश आहे. मुलींच्या गटात शर्वरी कराळे (४४ किलो) आणि प्रांजल मुळे (५३ किलो) या खेळाडूंची निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच सहाय्यक प्रशिक्षक डॉ. शेख आहात, राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक ऋषिकेश टाक आणि धोंडीबा चिकटवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

या खेळाडूंच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरशीकर, डॉ. राहुल वाघमारे, राष्ट्रपाल नरवाडे, डॉ. हंसराज वैद्य, संजय चव्हाण, मुन्ना देशपांडे, सुलभा स्वामी, संतोष स्वामी यांच्यासह क्रीडाप्रेमी, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. नांदेडच्या या ११ खेळाडूंकडून राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, लातूर विभागाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्व खेळाडू सज्ज झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!