चौंडी–आंबा टी-पॉईंट परिसरात खळबळ; अज्ञात हल्लेखोराचा पोलिसांकडून कसून शोध सुरू

वसमत (प्रतिनिधी) – वसमत तालुक्यातील चौंडी–आंबा टी-पॉईंट परिसरात इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, पेट्रोल पंपाच्या आवारात संबंधित अधिकारी मृतावस्थेत आढळून आला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या हत्येमागील नेमके कारण असे सांगितले जात आहे की चौंडी–आंबा येथील इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप योग्य रीतीने चालवला जात नव्हता. म्हणून तो पंप दुसऱ्या डिलरला हस्तांतरित करण्यासाठी इंडियन ऑईलचे विक्री व्यवस्थापक  महेश अण्णाराव शेळके हे ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तेथे आले होते.

तेव्हा पेट्रोल पंपच्या मालकाच्या मुलाने आणि त्याच्या काही मित्रांनी शेळकेवर चाकूने हल्ला केला. चाकूचे वार शरीरावर अनेक ठिकाणी करण्यात आले त्यामुळे शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.आपला पेट्रोल पंप दुसऱ्याला दिला जात आहे या रागातून ही हत्या घडवण्यात आली आहे.कंपनीच्या नियमानुसार सर्व काही योग्य चालवले असते तर पंप दुसऱ्याला हस्तांतरित करण्याची वेळच आली नसती. हा तर निवळ दादागिरीला प्रकार आहे. कंपनीने घेतलेला निर्णय अंमलात आणण्यासाठी शेळके तेथे गेले होते. पेट्रोल पंप हस्तांरणाचा निर्णय महेश शेळके यांचा नव्हता. पण आज ते शेळके कुटुंबियांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे. हल्लेखोरांनी महेश शेळके मरण पावले तरी त्यांच्या शरीरावर चाकूचे घाव घालतच राहिले असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले आहे.

चोंडी आंबा येथील पेट्रोल पंप मालक साहेबराव पांडववीर हे आहेत. महेश शेळकेवर हल्ला करून त्यांचा जीव घेणाऱ्यांपैकी एकाचे नाव उमेश पांडववीर असे आहे. कुरुंदा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी आणि त्यांचे सहकारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!