हरिश्चंद्र तांडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; हसतमुख आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वाची कायम स्मरणात राहणारी ओळख नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलात आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेसोबतच हसतमुख, मनमिळावू आणि आपुलकीच्या स्वभावामुळे स्वतंत्र ओळख निर्माण करणारे निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन रामधन राठोड (६०) यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलासह त्यांच्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. राठोड यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रदीर्घ काळ सेवा बजावताना आपल्या कार्यशैलीने सहकाऱ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी ते पोलीस दलातील सेवेतून निवृत्त झाले होते. सेवाकाळात कठीण परिस्थितीतही संयम, प्रसन्नता आणि सहकार्याची भावना जपणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्त्व हीच त्यांची सर्वाधिक ठळक ओळख मानली जात होती. पदाचा कोणताही बडेजाव न करता सहकाऱ्यांशी आपुलकीने वागणे, प्रत्येकाशी प्रेमाने संवाद साधणे आणि संकटाच्या प्रसंगी धीर देणे, या गुणांमुळे राठोड यांनी अनेकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी त्यांच्या मूळ गावी हरिश्चंद्र तांडा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, परिचित तसेच पोलीस दलातील सहकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड गमावल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्य बजावताना माणुसकी जपणारे आणि आपल्या हसतमुख स्वभावाने सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे किशन रामधन राठोड यांच्या आठवणी त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि परिचितांच्या मनात कायम जिवंत राहतील. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार राठोड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, दिवंगत किसन रामधन राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. Kanthak Suryatal Post Views: 200 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तरोडा गॅस स्मशानभूमी प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार; सत्ताधारीसह समस्त तरोडा बुद्रुक जुन्या गावच्या ग्रामस्थांचा एल्गार