नांदेड(प्रतिनिधी) – एकीकडे तरोडा येथील प्रस्तावित गॅस स्मशानभूमीचा मार्ग मोकळा झाल्याचा देखावा महापालिका प्रशासन करत असतानाच, दुसऱ्या बाजूला या प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. गोवर्धनघाट, सिडको आणि तरोडा येथील स्मशानभूमीची कामे अनेक वर्षांपासून अर्धवट ठेवून केवळ कागदावर घोडे नाचवणाऱ्या भ्रष्टाचारी महापालिका प्रशासनाविरोधात समस्त तरोडा बुद्रुक जुन्या गावचे ग्रामस्थ आणि विरोधक अत्यंत आक्रमक झाले आहेत. कागदावर कामे युद्धपातळीवर दाखवून प्रत्यक्षात मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करणाऱ्या या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी ‘सत्ताधारी विरोधक आणि गावातील नागरिकांनी थेट संघर्षाचे हत्यार उपसले आहे. काम अर्धवट, तरीही टेंडरची घाई; भ्रष्टाचाराचा संशयास्पद कारभार मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने आधीच अनेक ठिकाणी स्मशानभूमीचा अर्धवट पसारा करून ठेवला आहे. गोवर्धनघाट येथील परिस्थिती अत्यंत भकास असून, तेथील कामे पूर्ण न करताच महापालिकेने तरोडा येथील गॅस शवदाहिनी खरेदीचे ‘अॅडव्हान्स टेंडर घाईघाईने वर्षभरापूर्वीच काढून ठेवले. कामे प्रत्यक्षात पूर्ण नसताना केवळ टक्केवारी आणि कमिशनच्या लाभासाठी नवीन निधी मंजूर करून घेण्याचा हा प्रकार असून, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने ऑडिट (Audit) करण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वारंवार निवेदने देऊनही आयुक्तांचे दुर्लक्ष; तीव्र प्रतिकार तरोडा बुद्रुक जुन्या गावातील रहिवाशांनी त्यांच्या आरोग्याचा आणि प्रदूषणाचा प्रश्न घेऊन अनेक वेळा महापालिका आयुक्तांना निवेदने दिली आहेत. निवासी वस्तीच्या अगदी जवळ हा प्रकल्प रेटून प्रशासन लहान मुले आणि वृद्धांच्या जिवाशी खेळत आहे. एवढे होऊनही हे सुस्त आणि भ्रष्टाचारी प्रशासन ढिम्म हललेले नाही. त्यामुळेच या मनमानी कारभाराला चव्हाट्यावर आणण्यासाठी नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. ग्रामस्थांचे आणि विरोधकांचे महापालिकेवर थेट प्रश्न: • टक्केवारीचा प्रयोग: जुनी कामे वर्षानुवर्षे अपूर्ण असताना आणि ठेकेदार ऐकत नसतानाही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? यामध्ये महापालिका अधिकाऱ्यांची टक्केवारी निश्चित झाली आहे का? • स्मशानभूमीचा छळ: मानवी शरीराचा अंतिम टप्पा असलेल्या पवित्र स्मशानभूमीच्या जागेचा विकास करण्याऐवजी महापालिकेने केवळ निधी लाटण्यासाठी या पवित्र स्थळाचा छळ मांडला आहे. • ग्रामस्थांना विश्वासात न घेता मोजणी: भूमी अभिलेखाचा आडोसा घेऊन ४३ गुंठे जागा ताब्यात घेतल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाने स्थानिक तरोडा बुद्रुकच्या ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. काम सुरू केल्यास भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना धडा शिकवणार! प्रशासनाने येत्या आठ दिवसांत काम सुरू करण्याची घोषणा केली असली, तरी समस्त तरोडा बुद्रुक जुन्या गावच्या ग्रामस्थांनी आणि विरोधकांनी याला तीव्र कडाडून विरोध केला आहे. जर जबरदस्तीने काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तर महापालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराचे वाभाडे काढत ‘एक जन आंदोलन नेतृत्वात संपूर्ण गाव रस्त्यावर उतरेल आणि तीव्र जनआंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 30 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्ह्यातून हिरवा व वाळलेला चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन रामधन राठोड यांचे निधन