खाक्या पोलिसांचा, पण माल चोरांचा! नांदेडमध्ये चोरांनी पोलिसाचेच घर साफ करून उठवली खळबळ

नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमधील कौठा भागातील रामबाग रेसिडेन्सी ही तशी उच्चभ्रू वस्ती मानली जाते, पण याच ठिकाणी चोरांनी थेट पोलिसाच्याच घरावर दरोडा टाकून पोलीस प्रशासनाला चांगलाच झटका दिला आहे.

नांदेड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे गुन्हे लेखक म्हणून कार्यरत असलेले आणि मूळ नेमणूक भाग्यनगर पोलीस ठाण्यात असलेले पोलीस हवालदार गजानन बळीराम कदम यांच्या घरी ही चोरी झाली. महालक्ष्मी सणानिमित्त १७ सप्टेंबर रोजी कदम यांचे कुटुंबीय मूळ गावी गोरठा येथे गेले होते. १८ सप्टेंबर रोजी दिवसभर कार्यालयात काम करून सायंकाळी घरी आलेल्या कदम यांनी आपली शासकीय पिस्तूल आणि ३० जिवंत काडतुसे घरात ठेवली. त्यानंतर जेवणासाठी घराबाहेर पडलेले कदम रात्री उशिरापर्यंत महत्त्वाच्या कामात व्यस्त राहिल्याने कार्यालयातच झोपले.

घर पूर्णपणे रिकामे असल्याची खात्रीशीर संधी साधत चोरट्यांनी चांगलाच हातसाफ केला. चोरांनी केवळ साडेसहा लाख रुपयांची रोख रक्कम आणि ५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेच लांबवले नाहीत, तर चक्क पोलीस हवालदाराची पिस्तूल आणि ३० जिवंत काडतुसेही पळवून नेली. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्याच घरामधून पिस्तूल पळवून चोरांनी पोलीस खात्यालाच थेट आव्हान दिले आहे.

या घटनेनंतर कदम यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी घटनास्थळाला भेट दिली. सध्या चोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पथके रवाना झाली आहेत.

विशेष म्हणजे, याच हद्दीत १८ सप्टेंबरच्याच रात्री शाहूनगर वाघाळा येथे संघरत्न उर्फ डोरेमॉन माधव वाघमारे या २० वर्षीय तरुणाचा खूनही झाला. एकाच रात्री खून आणि पोलिसाच्याच घरात दरोडा पडल्याने, रात्रीची पोलीस गस्त नेमकी कुठे चालते आणि शोध पथके नेमका कशाचा शोध घेत असतात असा खोचक सवाल आता नागरिक विचारत आहेत. आता चोरांच्या हातात गेलेली स्वतःचीच पिस्तूल आणि काडतुसे शोधून काढणे हे पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान बनले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!