आईची तक्रार होताच शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २८ वर्षीय आरोपी अटकेत

नांदेड(प्रतिनिधी) :-शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत २८ वर्षीय आरोपी आदिनाथ जाधव याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटना समोर येताच पीडितेच्या आईने धाव घेत शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवाजीनगर पोलिसांनी विलंब न करता गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

अल्पवयीन बालिकांवरील अत्याचाराच्या घटना समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब ठरत आहेत. स्वतःचे संरक्षण करण्याच्या वयात नसलेल्या बालिकांना लक्ष्य करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि समाजाची अधिक सजग भूमिका आवश्यक आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच केलेली तातडीची कारवाई महत्त्वाची ठरली आहे. मात्र, तपासात समोर येणाऱ्या प्रत्येक बाबीची सखोल चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!