महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतांना आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या. त्या शपथा नाहीत, तर एका नव्या जीवनदृष्टीचा स्वीकार आहे. गद्दार बौद्धांचा नवा जन्म व्हावा म्हणून किंवा त्यांच्या काळोख्या मेंदूत आंबेडकरी प्रज्ञाप्रकाश पडावा म्हणून दरवर्षी दैनिक सम्राट बावीस प्रतिज्ञांची आठवण गणेशोत्सव, दुर्गोत्सव वगैरे हिंदू सणांच्या काळात दररोज करुन देते. कारण दैनिक वृत्तरत्न सम्राट हे केवळ दैनिक वृत्तपत्र नाही तर ती उभी चळवळ आहे. मुसलमान, जैन, ख्रिश्चन, शीख किंवा पारशी या अल्पसंख्याक समाजातील सर्वसामान्य, धार्मिक किंवा राजकीय लोक हे हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतांची पूजा, उपासना किंवा सण साजरे करीत नाहीत, अशी सम्राटची धारणा आहे. जे बौद्ध लोक घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी आणि तथागताच्य धम्माशी गद्दारी करीत आहेत, अशांसाठी दैनिक वृत्तरत्न सम्राट दररोज २२ प्रतिज्ञा त्यांच्या मेंदूंची कवाडे उघडावीत म्हणून प्रकाशित करीत आहे. तेव्हा सम्राटचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. या बावीस प्रतिज्ञांचा अन्वयार्थ समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. पहिलीच मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.  बाबासाहेब बुद्धाच्या मार्गावर गेले. बौद्ध धम्मात सृष्टीचा निर्माता म्हणून कोणताही ईश्वर मानला जात नाही. कर्म आणि कार्यकारणभाव यावर भर आहे. त्यामुळे निर्माता ब्रह्मा, पालक विष्णू आणि संहारक महेश ही त्रिमूर्तीची कल्पना बौद्ध तत्वज्ञानाला मान्य नाही. ही प्रतिज्ञा ईश्वरवादी धर्मातून मानवतावादी आणि बुद्धिवादी धर्माकडे जाण्याची घोषणा आहे. बाबासाहेबांच्या मते, मनुस्मृतीसारख्या ग्रंथात ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, मांड्यातून वैश्य आणि पायातून शूद्र जन्माला आले, अशी कथा सांगून वर्णव्यवस्थेला दैवी आधार दिला गेला. त्यामुळे ब्रह्माला देव मानणे म्हणजे त्या जन्माधिष्ठित विषमतेला मान्यता देण्यासारखे आहे, असे त्यांचे विश्लेषण होते. म्हणून या देवतांची उपासना नाकारणे म्हणजे विषमतेचा पाया नाकारणे. याचा अर्थ इतरांच्या श्रद्धेचा द्वेष करणे असा नाही. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले होते की, मी कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. तर याचा अर्थ आहे – मी आता माझी श्रद्धा, माझी उपासना बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांमध्ये ठेवीन. मी अवतारवाद, चमत्कार आणि आत्मा-परमात्म्याच्या कल्पनेवर आधारित उपासना करणार नाही.  ही प्रतिज्ञा देवतांचा अपमान नाही, तर एका व्यक्तीने आपल्या जुन्या धार्मिक चौकटीतून बाहेर पडून बुद्धाच्या समता, विज्ञानवाद आणि मानवतावादाच्या मार्गावर जाण्याचा केलेला संकल्प आहे.
              मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. या दुसऱ्या प्रतिज्ञेचा अन्वयार्थ पहिल्या प्रतिज्ञेच्या पुढचा भाग आहे. बाबासाहेबांचा यामागचा विचार असा होता की बौद्ध धम्मात बुद्ध हा देव नाही, तर मार्गदाता आहे. मनुष्याने स्वतः प्रयत्न करून दुःखमुक्त व्हावे, हा बुद्धाचा विचार आहे. तर राम आणि कृष्ण हे विष्णूचे अवतार मानले जातात. अवतारवाद म्हणजे देवच मनुष्यरूपात येऊन आपले रक्षण करेल, या विचारावर बाबासाहेबांचा विश्वास नव्हता. त्यांचा भर स्वावलंबनावर होता – तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार बना. बाबासाहेबांनी रामायण, महाभारत, गीता यांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी ‘रामायणातील खरी माणसे’, ‘कृष्ण आणि त्याची गीता’ या लेखांमध्ये लिहिले आहे की, या कथांमधील काही प्रसंग – जसे शंबूक वध, सीता त्याग, एकलव्याचा अंगठा घेणे – हे समतेच्या आणि न्यायाच्या कसोटीवर त्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी व्यक्ती म्हणून नव्हे, तर देव म्हणून त्यांची पूजा नाकारली.  बाबासाहेबांना समाजापुढे नवे आदर्श ठेवायचे होते. युद्ध करणारा, राज्य करणारा राजा हा आदर्श नको, तर करुणा, मैत्री, समता आणि प्रज्ञा शिकवणारा बुद्ध हा आदर्श हवा होता. म्हणून त्यांनी सांगितले की, आता माझा आदर्श बुद्ध आहे. बाबासाहेबांनी कधीही राम-कृष्णाचा द्वेष करा असे सांगितले नाही. उलट ते म्हणतात – मला कोणाचाही द्वेष करायचा नाही. मला माझ्या लोकांना एक स्पष्ट मार्ग द्यायचा आहे. या प्रतिज्ञेचा सरळ अर्थ हा आहे की मी आता बौद्ध झालो आहे, त्यामुळे मी माझी भक्ती आणि उपासना बुद्ध, धम्म आणि संघ यांच्यावर केंद्रित करीन. तिसरी प्रतिज्ञा  मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. या तिसऱ्या प्रतिज्ञेने पहिल्या दोन प्रतिज्ञा पूर्ण होतात. बाबासाहेबांनी यातून संपूर्ण हिंदू देवता परंपरेतून बाहेर पडण्याचा मार्ग स्पष्ट केला. हिंदू धर्मात अनेक देव-देवतांची उपासना केली जाते – कोणी संपत्तीसाठी लक्ष्मी, कोणी विद्येसाठी सरस्वती, कोणी विघ्नहर्ता म्हणून गणपती कवटाळून बसतात. बाबासाहेब म्हणतात, या प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा देव मानणे म्हणजे मनुष्याला परावलंबी बनवणे. बौद्ध धम्मात असे मानले जाते की, विद्या अभ्यासाने मिळते, संपत्ती कष्टाने मिळते, विघ्ने आपल्या प्रज्ञेने दूर होतात. त्यासाठी कोणत्याही देवतेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. गौरी, गणपतीच्या पूजेसोबत अनेक व्रत-वैकल्ये, उपवास, नवस, होम-हवन जोडलेले आहेत. या कर्मकांडात वेळ, पैसा आणि श्रम वाया जातो आणि माणूस दैववादी बनतो. बाबासाहेबांना आपल्या समाजाला या कर्मकांडातून बाहेर काढून विज्ञानवादी बनवायचे होते. जसे एखादा विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतो, तेव्हा तो जुन्या शाळेचा गणवेश घालत नाही. तसेच, बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर आता माझी सर्व श्रद्धा त्रिरत्नांवर – बुद्ध (मार्गदाता), धम्म (मार्ग) आणि संघ (मार्गावर चालणारे) यांच्यावर असेल. दोन ठिकाणी मन ठेवल्याने धम्मात प्रगती होणार नाही. ही प्रतिज्ञा कोणत्याही देव-देवतेचा अपमान करण्यासाठी नाही, तर मी आता जुने धर्मग्रंथ, जुने देव आणि जुनी उपासना पद्धती सोडून बुद्धाच्या मार्गावर पूर्णपणे आलो आहे याची स्पष्ट घोषणा आहे.
          देवाने अवतार घेतला, यावर माझा विश्वास नाही. ही प्रतिज्ञा बाबासाहेबांच्या बुद्धिवादी विचारांचा गाभा आहे. अवतारवाद सांगतो की, जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा देव स्वतः जन्म घेतो आणि दुष्टांचा नाश करतो. बाबासाहेब विचारतात – जर देव अवतार घेतोच, तर मग हजारो वर्षे अस्पृश्यांवर अन्याय होत होता तेव्हा तो का आला नाही? त्यामुळे त्यांचे म्हणणे होते, आपल्या मुक्तीसाठी देव येणार नाही, आपल्यालाच लढावे लागेल. हा विचार माणसाला स्वावलंबी बनवतो. बुद्धाने कधीही स्वतःला देव किंवा देवाचा अवतार म्हटले नाही. तो म्हणाला – मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. प्रत्येक माणसात बुद्ध होण्याची क्षमता आहे. तो देवाकडून मिळत नाही, तर स्वतःच्या प्रयत्नाने, शील, समाधी आणि प्रज्ञेने मिळतो. म्हणून अवतार ही कल्पना बौद्ध धम्माला मान्य नाही. बाबासाहेब म्हणायचे, राम, कृष्ण, परशुराम हे अवतार नसून त्या काळातील ऐतिहासिक महापुरुष असू शकतात. त्यांना देव बनवल्याने त्यांच्या खऱ्या कार्याचा चिकित्सक अभ्यास होत नाही आणि लोक चमत्कारावर विश्वास ठेवू लागतात. ही प्रतिज्ञा म्हणजे आता मी चमत्कारावर विश्वास ठेवणार नाही. कोणीतरी येऊन मला वाचवेल या आशेवर बसणार नाही. मी स्वतः माझ्या दुःखाचा अंत करीन, बुद्धाने दाखवलेल्या मार्गावर चालून. पाचवी प्रतिज्ञा तर या सगळ्याचा पाया आहे. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. ही प्रतिज्ञा बाबासाहेबांनी मुद्दाम स्वतंत्रपणे दिली, कारण हा त्यांच्या काळातील सगळ्यात मोठा गैरसमज होता. बौद्ध धम्म भारतातून जवळपास नाहीसा झाल्यानंतर, ८ व्या शतकाच्या आसपास पुराणांमध्ये एक कथा घुसवली गेली की, दैत्यांना मोहात पाडून वेदापासून दूर करण्यासाठी विष्णूने बुद्धाचा अवतार घेतला. बाबासाहेब याला खोडसाळ प्रचार’ म्हणतात. कारण यामुळे बुद्धाचा स्वतंत्र धर्म म्हणून असलेला दर्जाच संपवला गेला आणि त्याला हिंदू धर्माच्या एका कोपऱ्यात बसवले गेले. बाबासाहेबांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात स्पष्ट लिहिले आहे की, बुद्धाने आत्मा, परमात्मा, ईश्वर, अवतार आणि वर्णव्यवस्था या पाचही गोष्टींना नकार दिला. जो माणूस आयुष्यभर ईश्वर आणि अवतारवादाच्या विरोधात लढला, तोच ईश्वराचा अवतार कसा असेल? हा सरळ तर्कविरोध आहे.  या प्रतिज्ञेतून बाबासाहेब सांगतात – बुद्ध हा कोणाचा अवतार नाही. तो एक ऐतिहासिक मानव आहे, ज्याने स्वतःच्या बुद्धीने सत्याचा शोध लावला. त्याला विष्णूचा नववा अवतार मानणे म्हणजे त्याच्या क्रांतीकारी विचारांना कमी लेखणे आहे. बुद्ध हा बुद्ध आहे, तो कोणाचा अवतार नाही.  ही प्रतिज्ञा म्हणजे माझा बुद्ध स्वतंत्र आहे. त्याला कोणाच्या आधाराची गरज नाही. मी त्याला अवतार म्हणून नाही, तर मार्गदाता, बोधिसत्व म्हणून मानतो. म्हणूनच बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या वेळी म्हटले होते – मी बौद्ध धर्मात येत आहे, तो हिंदू धर्माची शाखा म्हणून नाही, तर एक स्वतंत्र, महान धर्म म्हणून.
             मी श्राद्धपक्ष करणार नाही किंवा पिंडदान करणार नाही. ही प्रतिज्ञा आपल्या रोजच्या जीवनातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला थेट भिडते. श्राद्ध आणि पिंडदानामागे कल्पना अशी आहे की, मृत व्यक्तीचा आत्मा पितृलोकात जातो आणि त्याला भूक लागते, म्हणून जिवंतांनी दिलेले अन्न (पिंड) कावळ्याच्या रूपाने त्याला मिळते. बौद्ध धम्म आत्माच मानत नाही. बुद्ध म्हणतात, जे आहे ते अनित्य आहे, अनात्म आहे. शरीर संपले की त्याच क्षणी त्याचे पंचमहाभूतात विलिनीकरण होते. मग मागे राहिलेला आत्मा नाही आणि त्याला भूकही नाही. म्हणून पिंडदान करणे वैज्ञानिक नाही.  बाबासाहेब म्हणायचे – जिवंतपणी आई-बापाला उपाशी ठेवायचे आणि मेल्यावर त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचे पिंड ठेवायचे, हा कसला धर्म? बौद्ध धम्म सांगतो, आई-वडील हेच जिवंतपणीचे सर्वात मोठे पूजनीय आहेत. त्यांची सेवा जिवंतपणी करा. मेल्यावर कावळ्याला घास देऊन ढोंग करू नका. श्राद्धपक्षाच्या नावाने ब्राह्मणाला दान-दक्षिणा, गायदान, शय्यादान असे प्रकार करून गरीब लोकांकडून पैसे उकळले जात होते. वाल्मीकि, महार, मातंग समाजातील लोकांना तर कर्ज काढून हे विधी करावे लागत. बाबासाहेबांना आपल्या समाजाला या आर्थिक लुटीतून वाचवायचे होते. ही प्रतिज्ञा म्हणजे मी मृतांच्या नावाने चालणारे कर्मकांड करणार नाही. मी माझ्या आई-वडिलांवर जिवंतपणी प्रेम करीन, त्यांची सेवा करीन. हाच खरा धम्म आहे. पुढच्या दोन प्रतिज्ञा याच्याशीच जोडलेल्या आहेत.  मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही आणि मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही. या दोन प्रतिज्ञा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बौद्ध धम्म म्हणजे काय? तर पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता. बाबासाहेब सांगतात – मी आता बौद्ध झालो, तर माझे आचरण बुद्धाने सांगितल्याप्रमाणे असले पाहिजे.
         मी प्राणिहिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू-मद्यपान करणार नाही आणि याच्या विरुद्ध  म्हणजे मी जीवहत्या, द्वेष, लोभ, अंधश्रद्धा यांच्या आहारी जाणार नाही. फक्त तोंडाने मी बौद्ध आहे म्हणणे पुरेसे नाही, तर आचरणातून बौद्ध दिसला पाहिजे. ८ वी प्रतिज्ञा तर सर्वात क्रांतिकारी प्रतिज्ञा आहे. बाबासाहेब ब्राह्मण व्यक्तीचा द्वेष करत नव्हते, तर ब्राह्मणशाही व्यवस्थेचा निषेध करत होते. त्याकाळी आणि आजही बऱ्याच ठिकाणी जन्मापासून मरणापर्यंत सर्व विधी ब्राह्मणाशिवाय होतच नसत. नामकरण, मुंज, लग्न, गृहप्रवेश, अंत्यसंस्कार या प्रत्येक विधीसाठी ब्राह्मणाला बोलवावे लागे, त्याला दक्षिणा द्यावी लागे. मंत्र संस्कृतमध्ये असत, ज्याचा अर्थ आपल्या लोकांना कळत नसे आणि याच व्यवस्थेने आपल्याला सांगितले होते की, तुम्ही धर्माशिवाय काही करू शकत नाही. बाबासाहेब म्हणतात, हा मानसिक गुलामगिरीचा जू फेकून द्या. मी माझ्या घरातील लग्न, बारसे, अंत्यसंस्कार स्वतः करीन किंवा माझ्या समाजातील, बौद्ध भिक्खूच्या हातून करून घेईन. मला दुसऱ्या कोणाची मध्यस्थी नको. बुद्धाने प्रत्येक माणसाला सांगितले आहे, अत्त दीप भव. स्वतःच स्वतःचा प्रकाश बना. ७ वी प्रतिज्ञा म्हणते – मी बौद्धासारखे वागेन तर ८ वी प्रतिज्ञा म्हणते – मी माझ्या जीवनाचे निर्णय स्वतः घेईन, कोणाच्याही मध्यस्थीशिवाय. हाच तर स्वाभिमान आहे. पुढची नववी प्रतिज्ञा  मी सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मानतो, ही आहे. ही २२ प्रतिज्ञांपैकी सगळ्यात मोठी, सगळ्यात सुंदर आणि बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा सार असलेली प्रतिज्ञा आहे. जन्माने कोणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नाही. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य सांगते – ब्राह्मण श्रेष्ठ, शूद्र कनिष्ठ. बाबासाहेब म्हणतात, हा भेद मी नाकारतो. माणूस जन्माने नव्हे, तर कर्माने आणि शीलाने मोठा होतो. वाल्मीकि असो, ब्राह्मण असो, महार असो, मातंग असो – सर्वांची लायकी एकच. बुद्धाने २५०० वर्षांपूर्वी हेच सांगितले होते, ‘न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो।कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणो।।’ (जन्माने कोणी शूद्र होत नाही, जन्माने ब्राह्मण होत नाही. कर्माने तो शूद्र होतो, कर्माने तो ब्राह्मण होतो.)  ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही, वागण्याची गोष्ट आहे, ही प्रतिज्ञा घेणे म्हणजे मी कोणालाही अस्पृश्य मानणार नाही, मी कोणासोबतही जेवण-पाणवठा, रोटी-बेटी व्यवहार करताना जात आडवी येऊ देणार नाही. मी माझ्याच समाजातील पोटजाती – महार, मांग, चांभार, वाल्मीकि यांच्यातही भेदभाव करणार नाही. आपण सगळे एक आहोत. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का निवडला? कारण फक्त बौद्ध धम्मातच समता आहे. बुद्धाच्या संघात राजा आणि रंक, ब्राह्मण आणि शूद्र एकाच पंक्तीत बसत. संघात आल्यावर – जसे समुद्रात गेल्यावर सर्व नद्या आपले नाव गमावतात, तसे संघात आल्यावर सर्वजण फक्त भिक्खू होतात. ही प्रतिज्ञा म्हणजे – आजपासून मी माझ्या मनातील उच्च-नीचतेची भावना कायमची काढून टाकतो. मी प्रत्येक माणसात माणूसच पाहीन. हाच खरा धम्म आहे. बाबासाहेबांनी यासाठीच शेवटी म्हटले होते, मला अशा धर्मात जायचे आहे जो समता, स्वातंत्र्य आणि बंधुता शिकवतो.
        पुढची प्रतिज्ञा याच समतेला कृतीत आणणारी आहे. मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन. बाबासाहेब म्हणतात, फक्त समता मानून उपयोग नाही, ती आणण्यासाठी झटलं पाहिजे. समता हा केवळ विचार नाही, जबाबदारी आहे. मी आता बौद्ध झालो म्हणजे माझी जबाबदारी संपली नाही, तर वाढली आहे. जिथे जिथे विषमता दिसेल – शाळेत, नोकरीत, मंदिरात, पाणवठ्यावर – तिथे मी समानतेचा आग्रह धरेन. बाबासाहेबांनी समता प्रस्थापित करण्यासाठी मार्गही सांगितला आहे. स्वतः शिका आणि दुसऱ्याला शिकवा. शिक्षणानेच विषमता संपते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एकट्याने समता येणार नाही. आपण स्वतःच जर आपल्याच समाजात – वाल्मीकि, महार, मांग, चांभार असा भेदभाव केला, तर समता कशी येईल? आधी आपल्या घरात समता आणा. बुद्धाने समता प्रस्थापित करण्यासाठी काय केले? त्याने सर्वांना धम्माची दारे उघडी केली. स्त्रियांना, शूद्रांना, अंगुलीमालसारख्या दरोडेखोराला, उपालीसारख्या न्हाव्याला संघात घेतले. बाबासाहेब म्हणतात, मलाही तेच करायचे आहे. ही प्रतिज्ञा म्हणजे – मी फक्त समतेचे गाणे गाणार नाही, तर जिथे अन्याय होत असेल तिथे उभा राहीन. माझ्या एका छोट्या कृतीने जरी एका माणसाला समानतेची वागणूक मिळाली, तरी माझे बौद्ध होणे सार्थकी लागेल. म्हणूनच बाबासाहेब शेवटपर्यंत म्हणाले – माझा लढा हा केवळ अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी नाही, तर संपूर्ण मानवतेच्या समतेसाठी आहे. पुढची अकरावी प्रतिज्ञा बौद्ध जीवनाचा प्राण आहे. मी बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन. हा मार्ग म्हणजे  बौद्ध धम्माचा हृदय आहे. बुद्धाने दुःखमुक्तीचा जो मार्ग सांगितला, तोच हा अष्टांगिक मार्ग. बाबासाहेब म्हणतात, मी आता बौद्ध झालो, तर फक्त देव बदलून उपयोग नाही, जगण्याचा मार्गच बदलला पाहिजे. अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हाच आहे. ही प्रतिज्ञा म्हणजे, मी आता माझे जीवन बुद्धाने दाखवलेल्या ८ पावलांवर चालेन. मी चांगले पाहीन, चांगले चिंतीन, चांगले बोलेन, चांगले वागेन आणि माझे मन शुद्ध ठेवीन. हा मार्ग कोणत्याही स्वर्गात नेत नाही, तर याच जीवनात तुम्हाला सुखी आणि शांत बनवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!