नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा येत्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी (१७ सप्टेंबर) रोजी आत्मदहन करण्याचा इशारा रातोळी (ता. नायगाव) येथील भाऊ बालाजी श्रावण गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधीतांकडे देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.
गायकवाड यांच्या निवेदनानुसार, त्यांच्या बहीण शिल्पा भीमानंद वाघमारे (वय ३०) यांना १३ ऑगस्ट २०२६ रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये दाखल करण्यात आले होते. १४ ऑगस्ट रोजी सकाळी चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच एका मिनिटात शिल्पा वाघमारे यांच्या तोंडातून फेस आला. आणि पलंगावरुन ती जमिनीवर पडली. त्यानंतर उपस्थित डॉक्टरसह नर्स व आजुबाजूच्या नागरिकांनी तीला उचलून पलंगावर झोपवले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन माझ्या आईला इंजेक्शनाने काही होत नाही तुम्ही घाबरु नका, असे खोटे सांगून वेळ मारुन नेली. प्रकृती गंभीर झाल्यामुळे माझ्या बहिणीस वॉर्ड क्र. १९ मध्ये नेवून तीच्यावर उपचार चालू आहे असे खोटे सांगितले. त्यानंतर अंदाजे सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान कर्तव्यावरील डॉ. धुलेवाड यांच्यासोबत असलेल्या वैद्यकीय पथकाने माझ्या आईस व बहिणीस वॉर्डाबाहेर येवून तुमचे रुग्ण मयत झाला आहे अशी माहिती दिली. हा प्रकार कसा व कशामुळे झाला याची चौकशी करण्यासाठी रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे गेलो. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून मयताचे शवविच्छेदन होवू द्या त्यानंतर आलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे दि.१५/८/२०२६ रोजी दुपारी अंदाजे १.३० वाजण्याच्या सुमारास बहिण शिल्पा वाघमारे हिचे शवविच्छेदन करण्यात आले. या सर्व घटनाक्रमावरुन दि.१४/८/२०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वॉर्ड क्र.१६ व १९ या ठिकाणी कर्तव्यावर हजर डॉक्टर व स्टॉफ यांच्या निष्काळजीपणामुळे माझी बहिण शिल्पा वाघमारे मयत झाली आहे. यावरुन नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली. सदरील घटनेचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. माझ्या बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींवर कायदेशिर कार्यवाही करावी. अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा मयत शिल्पा वाघमारे यांचे बंधु बालाजी गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती संबंधीतांना देण्यात आल्या आहेत.
