नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप हे नांदेड जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथे येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. या वेळी नागरिकांना पोलीस विभागाशी संबंधित आपल्या तक्रारी, समस्या अथवा अडचणी थेट त्यांच्या समोर मांडता येणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी निर्धारित वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
