नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नांदेड ग्रामीण आणि भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच विद्युत मोटार, केबल व स्टार्टर असा एकूण १ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.
देगलूरमध्ये दुकान फोडून ४५ हजारांची रोकड लंपास
देगलूर मंडा, ता. देगलूर येथे २० ऑगस्ट रोजी रात्री ११ ते २१ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातील ४५ हजार रुपये रोख चोरून नेले. याप्रकरणी भिमेश विठ्ठलराव कोटगीरे (वय ४८, रा. रेल्वे गल्ली, देगलूर) यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ पुरी करीत आहेत.
सीआयडीसीओत घराचे कुलूप तोडून दागिने चोरी
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक, सीआयडीसीओ येथे १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. कैलास गोविंद जाधव (वय ३९, रा. संभाजी चौक, सीआयडीसीओ, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ माने करीत आहेत.
भोकर रेल्वे स्थानक परिसरातून मोटार, केबल व स्टार्टर चोरी
भोकर रेल्वे स्थानक परिसरात २० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ५ एचपी मोटार, ३०० फूट केबल वायर व स्टार्टर, असा एकूण ३२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सुनील अशोक गायकवाड (वय ३२, रा. भोकर, ता. भोकर) यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ केंद्रे करीत आहेत. या तिन्ही घटनांमुळे परिसरात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अज्ञात चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
