भारतातील लोकसभेच्या 16 व्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून 7 टप्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्यातील मतदान झाले आहे.सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला यंदाच्या निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. विरोधक सांगतात भारतीय जनता पार्टी संपली आहे. निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी येणार आहे. परंतू निवडणुका दरम्यान सुरू असलेेले वेगवेगळे प्रयत्न, शब्दांचा खेळ, समाज माध्यमांचा वापर यावरून भारतीय संविधानाने जातीयवाद संपवला असतांना सुध्दा जातीवर आधारीत निवडणुका होत आहेत हे स्पष्ट आहे. कोण जिंकेल, कोण हारेल याला तेवढे महत्व नाही. परंतू जगात प्रसिध्द असलेली भारताची प्रगल्भ लोकशाही जिवंत राहावी यासाठीच आमचा खटाटोप. मतदारांना वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा आवाहन करते आहे की, जास्तीत जास्त संख्येत मतदान करा.तरच भारताची लोकशाही खऱ्या अर्थाने “दब्बर’ होईल.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 4 दशके फक्त कॉंगे्रसने एकहाथी सत्ता देशावर गाजवली. त्यानंतर काही बदल झाले, त्या बदलांना जनतेने पुन्हा नाकारले. मागील दहा वर्षापासून भारताची सरकार भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे. कधी काळी भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस सांगायचे राज्याच्या राजकीय पक्षांशिवाय भारताची लोकशाही चालवता येणे पुढील 20 वर्ष अशक्य आहे. त्यांचे शब्द खरे ठरले. परंतू सन 2014 पासून भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्राच्या सत्तेत आली. त्यांनी सुध्दा काही सहकारी हाताशी घेतले आहेत. पण सर्वाधिक खासदारांचा आकडा भारतीय जनता पार्टीचाच आहे.
सन 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एमपीएलए कायद्यातील कलम 45 रद्द केले होते. त्यानंतर सन 2018 मध्ये भारतीय जनता पार्टीने संसदेत पुन्हा हे रद्द केलेले कलम 45 प्रत्यक्षात आणले आणि सन 2019 पासून ईडीच्या कार्यवाह्या सुरू झाल्या. हा कायद्याचा विषय आहे. जो चुकेल त्याच्यासाठीच कायदा तयार केलेला आहे आणि चुकलेल्या माणसावर कायद्याच्या अनुरूप कार्यवाही होणे आवश्यकच आहे. तरच भारतात कायद्याचे अधिराज्य गाजेल नसता अराजकता माजेल.
सन 2014 नंतर विरोधी पक्षांमध्ये सुध्दा एक दुसऱ्याच्या विरुध्द बोलणे, आपलेच गुप्त रेखाटन जाहीर करणे अशी सुरूवात झाली. त्यामुळे विरोधी पक्ष विस्कळीत होत गेला. त्यांच्यातली एकजुट कायम राहिलीच नाही आणि याचाच फायदा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला मिळत गेला. असे म्हणतात प्रेम आणि युध्दात सर्वकाही चालते. त्यानुसार भारतीय जनता पार्टीने काही प्रसार माध्यमांना आपल्या हाताशी धरले(आम्ही खरेदी केले हे लिहिण्यासाठी भित आहोत) आणि भारतीय जनता पार्टी किंबहुना मोदी किती चांगले आहेत हे दाखविण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा विषयच मागील पाच वर्षात दिसला नाही असो. प्रत्येकाची आप-आपली आवडी आहे. आप-आपल्या गरजा आहेत, आप-आपली मजबुरी आहे.
विरोधी पक्ष सांगतो की, मोदी सरकार यंदा संपणार आहे. पण कसे संपणार याचे कोणतेही गणित विरोधी पक्षाला सांगता येत नाही. 2014 ते आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा विचार केला तर विदेश नितीमध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत झाले नाही अशी अनेक कामे झाली. 500 वर्षापासूनचा प्रभु श्री राम मंदिराचा लढा आता संपला आहे. कश्मिरमधील कलम 370 रद्द करण्यात आले आहे. घुसखोरांसाठी एनआरसी कायदा आणला आहे. हे सर्व खरे असले तरी मणीपुरमध्ये भारतीय जनता पार्टीचे शासन असतांना तेथे महिलांची काढलेली नग्नधिंड हा विषय सुध्दा एवढा छोटा नाही. कश्मिरमध्ये 400 किलो आरडीएक्सच्या माध्यमाने शेकडो भारतीय जवानांचा जिवघेण्यात आला त्याचाही पत्ता अजून लागलेला नाही. पण यंदा मोदी सरकारला 400 पार खासदार पाहिजेत. असे सांगतात यापुर्वी एकदा राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर कॉंगे्रसला 403 जागा मिळाल्या होत्या. तो रेकॉर्ड बे्रक करायचा आहे.
400 पार खासदार भारतीय जनता पार्टीला मिळाले ती तर हुकूमशाहीच होईल लोकशाही शिल्लकच राहणार नाही. लोकशाहीमध्ये मजबुत विरोधी पक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. पण तो नसेल तर सत्ताधारी पक्षांना प्रश्न कोण विचारली, त्यांच्या कामावर टिका कोण करेल आणि टिकाच झाली नाही तर उत्कृष्ट काम कसे होईल. आज रशियाचे अध्यक्ष पुतीन हे आपल्या विरोधकांना समाप्त करून आपली सत्ता गाजवत आहेत. अशाच पध्दतीने भारतीय जनता पार्टीने ईडीचा वापर करून नेत्यांना संपविले नाही. परंतू त्यांना शिल्लक सुध्दा ठेवले नाही. ए.राजा हा तामिळनाडूतील नेता स्प्रेक्टम घोट्यात तीन वर्ष जेलमध्ये होता. परंतू त्याची जामीन झाल्यानंतर तो चेनई विमानतळावर उतरला तेंव्हा त्याच्या स्वागतासाठी 5 लाख लोक आले होते. याला विसरता येणार नाही. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुध्दा जेलमध्ये टाकण्यात आले आहे. त्यांच्या मागे मद्य घोटाळा आहे. पण त्या मद्य घोटाळ्यात एकही रुपयाची जप्ती झालेली नाही. फक्त काही अटक केलेल्या आणि नंतर शासकीय साक्षीदार झालेल्या लोकांच्या जबानीनंतर त्यांना अटक झालेली आहे. संजयसिंहला जामीन देतांना सर्वोच्च न्यायालयाने ईडीला प्रश्न विचारला होता कलम 45 प्रमाणे या प्रकरणाचा निर्णय घ्यावा काय? यात खुप मोठा मतितार्थ आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री जेलमध्ये असले तरी तेथील बहुतांश खासदार भारतीय जनता पार्टीचेच निवडुण येतात. पण दिल्ली सरकार आप पक्षाची निवडुण येते. या मागे काय गणित आहे हे भारतीय जनता पार्टीला शोधता आले नाही असो हे राजकारण आहे. देशासाठी चांगले काम करणारे खासदार मतदारांनी निवडूण द्यावेत, त्यांच्याकडून अगोदरच वचननामा लिहुन घ्यावा जेणे करून नंतर आपल्याला ओरडण्याची वेळ येणार नाही.यासाठीच आम्ही ही शब्द रचना केली आहे. प्रत्येक बाबीचे विश्लेषण केले तर जागा पुरणार नाही एवढे शब्द आहेत. परंतू हे नक्की सांगायेच आहे की, 55 ते 60 टक्के मतदान होते म्हणजे 45 ते 40 टक्के लोक अगोदरच या निवडणुकीच्या विरोधात आहेत. झालेल्या मतदानापैकी 30 ते 35 टक्के मतदान मिळवणारा व्यक्ती निवडूण येतो याचे गणित केले तर 100 टक्के पेक्षा जास्त लोक ज्या माणसाच्या विरोधात आहेत तो माणुस निवडुण येतो. म्हणूनच वास्तव न्युज लाईव्हचे मतदारांना आवाहन आहे की, जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा आणि भारतीय लोकशाहीला दब्बर करण्यासाठी थोडीशी मेहनत घ्या. आमच्या मते जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना शिक्षा व्हावी असा कायदा येण्याची गरज आहे. पण नेते मंडळी असा कायदा आणणार नाहीत. कारण या कमी मतदानाच्या जोरावर तर ते निवडुण येतात हेच भारताच्या प्रगल्भ लोकशाहीचे दुर्देव आहे.