नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहर आणि परिसरात जबरी चोऱ्या आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यांवर नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, इतवारा पोलीस आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या शोध पथकांनी संयुक्त कारवाई करून तब्बल ९ गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोन्याचे दागिने, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण ६,७४,०७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिली. या पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ,राजेश पुरी,अतुल भोसले उपस्थित होते.
इतवारा, शिवाजीनगर, सोनखेड आणि भाग्यनगर परिसरातील ५ चैन स्नॅचिंग गुन्हे उघड
इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आरोपी योगेश नरसिंग दारेवाड, वय १८ वर्षे, राहणार संतवाडी, पुरी, चौफाळा, नांदेड आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांचा खालील ५ गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे:
- इतवारा पोलीस ठाणे गु.र.नं. २७५/२०२६: १० ऑगस्ट २०२६ रोजी पायी जाणाऱ्या महिलेचे १८,१२५ रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र हिसकावून नेले होते.
- शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ३५३/२०२६: १३ ऑगस्ट २०२६ रोजी पायी जाणाऱ्या महिलेचे अंदाजे ७०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसकावून नेले होते.
- सोनखेड पोलीस ठाणे गु.र.नं. १९५/२०२६: १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी वडेपुरी परिसरातून जाणाऱ्या महिलेच्या गाडीला जाणीवपूर्वक धडक देऊन खाली पाडले आणि २५,००० रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसकावले होते.
- भाग्यनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ४४९/२०२६: ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री श्रीनगर येथील पंचशील दुकानासमोर दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याला अडवून ३०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसकावून नेले होते.
- भाग्यनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ४५०/२०२६: १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पिरबुर्हाणनगर येथे आपल्या घरासमोर पतीची वाट पाहत थांबलेल्या महिलेचे २७,००० रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार झाले होते.
हस्तगत केलेला मुद्देमाल: आरोपींकडून १ सोन्याचे शॉर्ट गंठण किंमत १,९४,३०० रुपये, सोन्याचे मणी व मंगळसूत्रे, व्हीव्हीओ VIVO कंपनीचे ४ स्मार्टफोन किंमत ९५,००० रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल किंमत ८०,००० रुपये असे एकूण ४,६४,९७५ रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दत्तनगर रेल्वे पटरीजवळील चैन स्नॅचिंगचा छडा
- शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ३४८/२०२६: ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी दत्तनगर रेल्वे पटरीच्या बाजूच्या रस्त्याने जाणाऱ्या महिलेचे ६०,००० रुपये किमतीचे मंगळसूत्र एका अनोळखी चोराने हिसकावले होते.
- कारवाई व जप्ती: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका विधी संघर्षग्रस्त बालकाला शोधून काढले. त्याच्या पालकांच्या ताब्यातून गुन्ह्यातील सोन्याची चैन वजन अंदाजे दीड तोळे, किंमत अंदाजे ६०,००० रुपये पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के मुद्देमाल जप्त केली आहे.
नांदेड ग्रामीण हद्दीतील पोत पळवणारा गजाआड
- नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ९७२/२०२६: १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री वाघळा येथे महिलेच्या गळ्यातील ६०,००० रुपये किमतीची सोन्याची पोत दोन अज्ञात इसमांनी हिसकावून नेली होती.
- कारवाई व जप्ती: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अरबाजखान खान उर्फ अब्बू आरेफखान पठाण, वय ३० वर्षे, राहणार फारुखनगर, नांदेड याला ताब्यात घेतले असून, त्याने व त्याच्या फरार साथीदाराने हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून ३०,००० रुपये किमतीचे अंदाजे दोन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
४. अण्णाभाऊ साठे चौकातील बॅग स्नॅचिंग आणि वाहन चोरीचा पर्दाफाश
- शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ३५९/२०२६: १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी अण्णाभाऊ साठे चौकातील लाईफ केअर हॉस्पिटलबाहेर पेपर वाचत बसलेल्या व्यक्तीचा २५,००० रुपये किमतीचा मोबाईल आणि बॅग तीन अज्ञात इसमांनी हिसकावून नेली होती.
- कारवाई व जप्ती: शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने आरोपी गणेश राजाराम हिवराळे, वय २८ वर्षे, राहणार नुरी चौक आणि शिवाजी पुंडलिक डुबुकवाड, वय २५ वर्षे, राहणार नुरी चौक यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल, ३ मोबाईल आणि बॅगमधील रोख रक्कम असा एकूण ५९,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली असल्याचे समोर आले.
५. महाराणा प्रताप चौकातील जबरी चोरीचा गुन्हा उघड
- विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं. ३८७/२०२६: १९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे दूध आणण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला महाराणा प्रताप चौकाजवळ अडवून खंजरचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली होती. चोरांनी त्यांच्या खिशातील ४,२०० रुपये रोख आणि ६०,००० रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल जबरीने चोरून नेली होती.
- कारवाई व जप्ती: या गुन्ह्यातही आरोपी गणेश हिवराळे आणि शिवाजी डुबुकवाड यांचा सहभाग उघडकीस आला असून, गुन्ह्यातील ६०,००० रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
