उमरी (प्रतिनिधी) – दारूच्या बाटल्यांचा मोह चोरट्यांनाही आवरता आला नाही, अशी घटना उमरी तालुक्यातील सोमठाणा परिसरात घडली. मधुबन बारला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी बारचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि काऊंटरमधील ६९ हजार ८८९ रुपयांची रोकड तसेच देशी-विदेशी दारूच्या बाटल्या असा ऐवज लंपास केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासून १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंत घडली. म्हणजे चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा पुरेपूर फायदा घेत बारमध्येच हात साफ केला! या प्रकरणी पांडुरंग बाळोजी कोलेवाड (वय ३६, रा. सोमठाणा, ता. उमरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपास प्रो.पो.उपनि. सूर्यवंशी करीत आहेत. आता पोलिसांच्या तपासात या दारूच्या शौकिन चोरट्यांचा माग कधी लागतो, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.एकीकडे बारमध्ये ग्राहक दारूचे पैसे देतात, तर चोरट्यांनी मात्र पैसे आणि दारू दोन्ही ‘फुकटात’ घेऊन जाण्याचा उद्योग केल्याने परिसरात चर्चा रंगली आहे
