नांदेड – श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष असा भेद न ठेवता भारतीय राज्यघटनेने मतदानाचा सर्वांना समान अधिकार दिला आहे. त्यासाठी सर्वांनी मतदान करावे यासाठी नायगाव तालुक्यातील उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनात नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी नायगाव येथील शासकीय समाजकल्याण वस्तीगृहात मतदान जनजागृती निमित्त उमेदच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील उमेदच्या समुदाय संसाधन व्यक्ती, बँक सखी, पशु सखे, कृषी सखी असे एकूण साठ महिला उपस्थित होत्या.
यावेळी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल जोंधळे यांनी मतदानाचे महत्त्व, हक्क व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करून प्रत्येक गावातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. मतदान प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.