नांदेड(प्रतिनिधी)-दि.21 जून रोजी दर्गाह हजरत शाह रहेमान या धार्मिक संस्थेचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक यांचा खून झाला होता. या प्रकरणात वजिराबाद पोलीसांनी 13 जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात मकोका लागल्यानंतर आज चार अटक असलेल्या आरोपींना हस्तांतरण वॉरंटवरून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना विशेष न्यायाधीश तुषार आगलावे यांनी 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या अगोदर एकाची मकोका पोलीस कोठडी समाप्त झाली आहे.
नायब मुतवली शेख शमीम शेख इसाक यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बंधू शेख वासीम शेख इसाक यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात गुुन्हा क्रमांक 302/2026 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मकोका काद्याची वाढ झाली. या प्रकरणात अटक 13 आरोपी आणि या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार मिर्झा शब्बर बेग मिर्झा गफार बेग याला पहिल्यांदा मकोकाची पोलीस कोठडी मंजुर झाली आणि ती संपली.
या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर वेंजने यांनी हस्तांतरण वॉरंटवर काल मुस्ताक अहेमद इसाक अहेमद (21), माधव भगवान कांबळे (21), अब्दुल तौखीर अब्दुल सगीर (24) आणि सय्यद सलीम सय्यद खासीम या चौघांना ताब्यात घेतले आणि आज न्यायालयासमक्ष हजर केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी अत्यंत मेहनत घेत मकोकाची पोलीस कोठडी का देणे आवश्यक आहे याचे सविस्तर सादरीकरण न्यायालयात केले. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश तुषार आगलावे यांनी या चार जणांना 21 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शेख शमीम हत्या प्रकरणात चार जणांना मकोका कायद्याअंतर्गत 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
