नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या मालकीचे भुखंड आपल्या मालिकेचे आहेत असे दाखवून त्याची खोट्या कागदपत्रांच्या आधारावर विक्री करून लाखो रुपयांचा आर्थिक फायदा करणाऱ्या दहा जणांपैकी पाच जणांना दहा वर्षानंतर चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणाची तक्रार सेवानिवृत्त असलेल्या आणि आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त महिलेने दिलेली आहे.
सन 2014 मध्ये सेवानिवृत्त शिक्षीका शमीम सुलताना महेमुदअली खान (70) रा.रहेमतनगर देगलूर नाका नांदेड यांनी तक्रार दिली की, मौजे ब्रम्हपुरी भागातील काही भुखंडांवर अतिक्रमण करून त्या भुखंडांची विक्री नोंदणीकृत विक्रीखत आधारे करून काही जणांनी फायदा मिळवला. हा प्रकार सन 2011 पासून सुरू होता. या प्रकरणात महानगरपालिकेने सुध्दा 30 ऑक्टोबर 2014 रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांना या वादग्रस्त भुखंडांवरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी पत्र दिले होते. पण शिक्षीका शमीम सुलतांना यांनी हा लढा सुरूच ठेवला आणि अखेर नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी मोहम्मद मुख्तार खान मासुम खान (40), आलम खान सलीम खान (22), माहेम्मद विखार अहेमद खान मसुद अहेमद खान (33), सय्यद मुर्तूजा अब्दुल रफिक(32) मोहम्मद रफिक मोहम्मद इब्राहिम(44), इमरान खान सलीम खान(23), अब्दुल शमीम अब्दुला(32), गौस खान करीम खान (32), मोहम्मद मनसुरअली खान उर्फ शाकेर साजेद अली खान (38), मुजाहिद जमा खॉ वहदुजमा खॉ (36) या दहा जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 469, 470, 471, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 304/2014 दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पी.डी.पुंडगे यांनी पुर्ण केला आणि दहा जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
न्यायालयात दहा साक्षीदारांकडून पुराव्यांची शाहनिशाह झाली आणि त्यानंतर सरकारी वकील ऍड.संजय वाघमारे आणि आरोपींच्या वकीलांकडून मांडण्यात आलेला युक्तीवाद लक्षात घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज या प्रकरणाचा निकाल देतांना दहा आरोपींपैकी इमरान खान सलीम खान, गौस खान करीम खान, मोहम्मद मनसुर अली खान उर्फ शाकेर साजेद अली खान, अब्दुल वसीम अब्दुला आणि मुजाहिद जमा खॉ वाहादुजमा खॉ या पाच जणांना त्यांच्यावरील आरोपांमध्ये 420, 468, 471, 34, 506 प्रमाणे मुक्ता केली. परंतू आरोपी मोहम्मद मुख्तार खान मसुद खान, मोहम्मद विखार अहेमद खान मसुद अहेमद खान, मोहम्मद रफिक मोहम्मद इब्राहिम, सय्यद मुर्तूजा अब्दुल रफिक आणि अमजद खान सलीम खान यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 468, 471 प्रमाणे मुक्त केले. पण या सर्व पाच आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 प्रमाणे दोषी जाहीर करून त्यांना तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 50 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली. हा दंड अडीच लाख रुपये होतो. या प्रकरणात नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार प्रकाश सुनकमवार यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले
तब्बल दहा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल आला. प्रकरणातील सर्व अडीच लाख रुपयांचा दंड या प्रकरणाचा फिर्यादी आदर्श सेवानिवृत्त शिक्षीका शमीन सुलतांना महेमुद अली खान (आज वय 80) यांना देण्याचे आदेश दिले आहेत. 80 वर्षाच्या शिक्षीका शमीम सुलतांना आज निर्णयाच्या दिवशी सुध्दा न्यायालयात हजर होत्या. याप्रकरणातील आरोपींमध्ये बहुतांश मंडळी ही राजकीय पक्षांशी संबंधीत आहेत.