नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसवेश्वर नगर परिसरातील एका नागरिकाची डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल ₹51 लाख 34 हजार 856 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै 2026 ते 24 जुलै 2026 या कालावधीत अज्ञात आरोपींनी संगनमत करून फिर्यादीशी संपर्क साधला. आरोपींनी स्वतःची ओळख कार्तिक यादव (डेटा प्रोटेक्शन बोर्ड, मुंबई), आर. के. चौधरी, प्रदीप जयस्वाल, विश्वास नांगरे पाटील आणि सुजल रॉय (पोलीस विभाग) अशी खोटी सांगितली. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी निधी (टेरर फंडिंग) प्रकरणात अडकविण्याची तसेच डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवत फिर्यादीकडून विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे ₹51,34,856 उकळले.या प्रकरणी मोहन लक्ष्मणराव घईनवाड (वय 56, रा. बसवेश्वर नगर, जुना कोटा, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 09/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक वसंत सपे हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, नागरिकांनी अज्ञात व्यक्तींकडून येणारे व्हिडिओ कॉल, डिजिटल अरेस्टच्या धमक्या किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगून पैशांची मागणी करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
