नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आज याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील ऑटोरिक्षा संघटनेच्या सहभागाने शहरात मतदान जनजागृती केली जाणार आहे.
नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेत आज
मंगळवार दिनांक १६ एप्रिल रोजी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मिनल करनवाल व महापालिकीचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ऑटोरिक्षांना मतदान करण्यासंदर्भाचे स्टीकर लावण्यात आले. यावेळी महापालीकेचे सहाय्यक आयुक्त गिरिष कदम, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, डॉ. सान्वी जेठानी आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. या चळवळीत ऑटोरिक्षा संघटनेने पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ऑटोरिक्षा बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना येत्या २६ एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी सांगावे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी व्होट करेगा व्होट करेगा सारा नांदेड व्होट करेगा या घोषवाक्ये परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वीप कक्षाचे प्रलोभ कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, सुनील मुत्तेपवार, शुभम तेलेवार, सारिका आचने, साईनाथ चिद्रावार, आशा घुलज, रवी ढगे आदींची उपस्थिती होती.
दिव्यांगांच्या मतदानासाठी ऑटोचालक येणार पुढे
नांदेड लोकसभा निवडणुकीत सर्वांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, मतदानापासून कुणी वंचित राहु नये, या हेतूने दिव्यांग, बहुविकलांग मतदारासाठी टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने माफक दरात ऑटोरिक्षा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अहेमद बाबा बागवाले यांनी माहिती दिली. दिव्यांगांना मतदान केंद्र पर्यंत येण्यासाठी आमची गरज लागल्यास मदत करूया ,असे त्यांनी सांगितले.