नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मुलाला काकाला मारुन टाकण्याचे प्रोत्साहन दिल्यानंतर पुतण्याने भर रस्त्यावर असंख्य लोकांच्या साक्षीने काकाचा खून करणाऱ्या पुतण्यास वसमत येथील जिल्हा न्यायाधीश आर.आर.हस्तेकर यांनी जन्मठेप आणि 500 रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दि.28 एप्रिल रोजी 2021 रोजी डॉ.अतुल किशनराव जगताप यांनी पोलीस ठाणे कुरूंदा येथे तक्रार दिली की, 27 एप्रिल 2021 रोजी त्यांचे वडील किशनराव तातेराव जगताप हे सायंकाळी 5 वाजता गावातील अन्नपुर्वे यांच्या सर्वज्ञ किराणा शॉपवर सामान खरेदी करण्यासाठी गेले असतांना त्यांचे सख्ये भाऊ आणि माझे काका गणेश तातेराव जगताप आणि त्यांचा मुलगा अंकुश गणेशराव जगताप यांची आणि माझे वडील किशन तातेराव जगताप यांची भेट झाली. तुझ्या काटा काढल्याशिवाय शेतीतील हिशाचा वाद मिटणार नाही अशा शब्दात चर्चा सुरू झाली तेंव्हा अंकुश गणेशराव जगताप याने फर्शी हातात घेवून माझ्या वडीलांवर हल्ला केला. या हल्यात माझ्या वडीलांच्या डोक्यावर जखम झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी अंकुशचे वडील गणेश तातेराव जगताप हे अंकुशला प्रोत्साहन देत असे सांगत होते की, तु याचा खून कर मी तुला सोडवून आणील. या तक्रारीनुसार कुरूंदा पोलीसांनी गणेश जगताप आणि त्यांचा मुलगा अंकुश जगताप यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 77/2021 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास कुरूंदाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.ए.गोपीनवार यांनी पुर्ण केला आणि गणेश तातेराव जगताप आणि त्यांचा मुलगा अंकुश गणेश जगताप या दोघांविरुध्द वसमत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयात हे प्रकरण सत्र खटला क्रमांक 37/2021 नुसार चालले.
या प्रकरणात सरकार पक्षाने 13 साक्षीदार तपासले त्यात मरण पावलेले. किशन तातेराव जगताप यांची मुलगी, पत्नी, वैद्यकीय अधिकारी आणि तपासीक अंमलदार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. या प्रकरणाचा युक्तीवाद करतांना वसमत येथील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड.संजय देशमुख(पिंपळगावकर) यांनी आरोपींनी शेतीच्या हिशातून आपला सखा भाऊ आणि काका यांचा खून केला आहे. त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असे मुद्दे मांडले. सरकार पक्षातर्फे आलेला पुरावा आणि युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश आर.आर.हस्तेकर यांनी काकाचा खून करणारा अंकुश गणेश जगताप यास जन्मठेप आणि 500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात कुरूंदा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार धतुरे आणि महिला पोलीस अंमलदार द्वारका यांनी सरकारी पक्षाला मदत केली.