नांदेड(प्रतिनिधी)-देगाव ता.अर्धापूर येथील एक जिल्हा परिषद शाळा फोडून चोरट्यांनी त्यातील 23 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.तसेच जरुर तांडा ता.किनवट येथून 45 हजार रुपयांचे पशुधन चोरीला गेले आहे.
देगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संभाजी शंकरराव वडजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 एप्रिलच्या दुपारी 12 ते 13 एप्रिलच्या सकाळी 6 वाजेदरम्यान देगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मुख्याध्यापक कक्ष कार्यालयातील साऊंड सिस्टीम 16 हजार 500 रुपये किंमतीचा आणि एक व्हिलचेअर 7000 रुपयांची असा 23 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बारड पोलीसांनी या बाबत चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पवार अधिक तपास करीत आहेत.
मौजे जरुर तांडा येथील विजेंद्र दत्तराम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 एप्रिलच्या दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान त्यांच्या जनावरांच्या गोठ्यातील 7 वर्षाचा बैल, किंमत 45 हजार रुपयांचा कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. मांडवी पोलीसांनी हा पशुधन चोरीचा गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस अंमलदार कनाके अधिक तपास करीत आहेत.