नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे एक घरफोडी करून 66 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच एक जबरी चोरी करून 68 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. देगलूर येथील एका जबरी चोरी प्रकरणात 59 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी बळजबरीने लुटला आहे.
लोणी रोड पुलाजवळ किनवट येथे अनिल भाऊराव राठोड हे पीएन केअर मायक्रो फायनान्सचे अधिकारी दुचाकीवरून जात असतांना त्यांच्या दुचाकीला 3 चोरट्यांनी लाथ मारली आणि ते खाली पडले. त्यांच्याजवळ असलेली 68 हजार रुपये रोख रक्कमेची बॅग या तिन चोरट्यांनी बळजबरीने घेवून गेले आहेत. हा घटनाक्रम 5 एप्रिलच्या सायंकाळी 6.30 वाजता घडला. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक चोपडे अधिक तपास करीत आहेत.
चंद्रशेखर प्रकाश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर 1 ते 2 वाजेदरम्यान ते नवीन बस स्थानक देगलूरच्या बाजूला थांबून खाजगी वाहन हैद्राबादला जाण्यासाठी मिळेल काय याची विचारपूस करत असतांना तीन अनोळखी माणसांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम, मनगटातील चांदीचे दोन ब्रासलेट, सोन्याची अंगठी आणि मोबाईल असा 59 हजार 200 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. चंद्रशेखर जाधव हे मुळ राहणार चिंचाळा ता.बिलोली येथील असून सध्या रामोजी फिल्मसिटी हैद्राबाद (तेलंगाणा) येथे राहतात. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.
किनवट येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार मल्लू येरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 मार्चच्या दुपारी 2 ते 1 एप्रिलच्या सकाळी 10 वाजेददरम्यान साईनगर किनवट येथील मुलांचे जिल्हा परिषदे शाळेतील दोन खोल्यांचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि वन प्लस एलईडी, स्मार्ट टी.व्ही., संगणक संच, प्रोजेक्टर, प्रिंटर, बॅटरी इनव्हरटर आणि साऊंड बॉक्स असा 66 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार वाडगुरे हे अधिक तपास करीत आहेत.