नांदेड(प्रतिनिधी)- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २२ व २३ जून २०२६ या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार या दोन दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनीही वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या काळात सुरक्षित ठिकाणी राहून सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुंडे यांनी केले आहे.
हवामानातील बदल लक्षात घेता शेतकरी, प्रवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
