नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा बदनाम उमेदवार आहे. म्हणूनच मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नांदेड लोकसभा निवडणुक लढविणार आहे, अशी माहिती ओबीसी नेते ऍड.अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ऍड.अविनाश भोसीकरसह, ऍड.कमलेश चौदंते, सचिन पेटकर आदी उपस्थित होते. मी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली आहे. मी ओबीसी समाजासाठी भरपूर काम केले आहे. पण वंचित बहुजन आघाडी हा एक तुल्यबळ राजकीय पक्ष असल्याने त्यात प्रवेश करून त्या पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुक लढविणार आहे असे सांगितले. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा बदनाम उमेदवार आहे. जिल्हाभरात आपल्या नातलगांचे भले करणे आणि दारुचे दुकान उघडणे यापेक्षा त्यांनी काही काम केले नाही. तसेच कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तुल्यबळ लढत देवू शकणार नाही. यामुळेच मी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने श्रध्देय ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात नांदेड लोकसभा निवडणुक लढविणार असल्याचे सांगितले. नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षामध्येच खासदारकीची लढत होणार आहे असेही ऍड.अविनाश भोसीकर म्हणाले.