नांदेड (प्रतिनिधी)- आमची सत्ता आल्यावर आम्ही नांदेडचे इंदोर करू,अशा वल्गना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केल्या होत्या. पण प्रत्यक्षात काय? सत्ता आली, वर्षे उलटली, पण नांदेडची परिस्थिती जैसे थे नव्हे, तर अधिकच भयानक झाली आहे. स्वच्छ इंदोरचे स्वप्न दाखवून नांदेडच्या जनतेला नरकयातना देण्याचे पाप प्रशासन आणि सत्ताधारी करत असल्याचा संताप आता जनसामान्यांतून व्यक्त होत आहे. वचनांचा पाचोळा, रस्ते आणि ड्रेनेजची वाट लागली! नांदेड शहराच्या कानाकोपऱ्यात आज रस्ते उखडलेले आहेत, ड्रेनेज लाईन तुंबलेल्या आहेत आणि नळाला पिण्याचे घाण पाणी येत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत इंदोरशी तुलना करणाऱ्यांना नांदेडमधील महावीर चौक ते वजिराबाद चौक या रस्त्यावरचा फेरफटका मारण्याचे धाडस तरी होईल का? या मुख्य रस्त्यावर गेल्या आठ दिवसांपासून ड्रेनेजचे चेंबर फुटलेले आहे. आठ दिवस उलटूनही प्रशासनाला याची साधी खबर नसावी, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. प्रशासनाची गेंड्याची चामडी, नागरिकच आता रक्षक महापालिका प्रशासनाचे डोळे उघडायला कदाचित एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा असावी. आठ दिवस हे ड्रेनेज चेंबर उघडे असतानाही कुणीही अधिकारी तिथे फिरकला नाही. शेवटी, एका जागरूक नागरिकाने प्रशासनाची वाट न पाहता त्या खड्ड्यात एक खांब रोवून त्याला काही जुने कपडे बांधले आहेत, जेणेकरून वाहनधारकांना संकटाची चाहूल लागेल. ज्या कामासाठी प्रशासन पगार घेते, ते काम सर्वसामान्य जनतेला करावे लागत असेल, तर या प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा काय उपयोग? नुसत्या गप्पा आणि फोटोसेशनचा सुळसुळाट! नांदेडच्या महापालिका प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना फक्त फोटो काढण्यात आणि बातम्या छापून घेण्यात’ रस आहे. शेवटच्या स्तरावर सामान्य नागरिकाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय, याकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कामाच्या नावावर केवळ पोकळ गप्पा मारल्या जात आहेत. प्रत्यक्षात काम करण्यासाठी लागणारी मेहनत आणि इच्छाशक्ती या प्रशासनाकडे उरलेली नाही, हेच या तुटलेल्या चेंबरवरून स्पष्ट होत आहे. निवडणुकीपुरता इंदोर, प्रत्यक्षात मात्र खड्ड्यांचे साम्राज्य! लोकांना केवळ स्वप्न दाखवून मते मिळवणे सोपे असते, पण दिलेले आश्वासन पाळण्यासाठी मेहनत करावी लागते. आज नांदेडची अवस्था पाहता, हेच का तुमचे इंदोर? असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. केवळ भाषणे ठोकून शहरे स्मार्ट होत नसतात, त्यासाठी जमिनीवर काम करावे लागते. प्रशासनाने आपली निद्रावस्था सोडावी आणि फोटो काढण्यापेक्षा खड्डे बुजवण्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा जनतेचा संताप अनावर होईल. ज्या रस्त्यावर हा खड्डा आहे त्या रस्त्यावर शहरातील सर्वाधिक वाहतूक सुरु असते. हा खड्डा आणि त्यातील तो खांब आज नांदेडच्या व्यवस्थेचे विदारक वास्तव मांडत आहे. आता तरी प्रशासन जागे होणार की अजून एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. Kanthak Suryatal Post Views: 557 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation का म्हणाले पहिल्यांदा खा. राहुल गांधी की येत्या वर्षभरात केंद्र सरकार पडणार प्रेम की भाषा शब्दों से नहीं, भावनाओं से समझी जाती है