नांदेडमध्ये प्रिगॅबॅलिन कॅप्सूलची अवैध विक्री करणाऱ्या मेडिकल चालकांवर कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस अंतर्गत वजीराबाद पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथक व अन्न-औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत नशा निर्माण करणाऱ्या Pregabalin Capsules ची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोन मेडिकल चालकांवर कारवाई केली आहे.

दिनांक 23 मे 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन मेडिकल, वाफना नांदेड तसेच हेल्थ ओके मेडिकल, दत्तनगर रोड, सम्राट नगर येथील मेडिकल दुकानांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत Pregabalin Capsules च्या एकूण 1540 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत 38 हजार 38 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बुलंगे तसेच पोलीस अंमलदार शिवसांभ मठपती,हबीब चाऊस,रमेश सूर्यवंशी,भाऊसाहेब राठोड,ज्वालासिंग बावरी,संतोष पोकले,विलास कदम आणि  गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही मोहीम राबवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून मेडिकलमधून गोळ्यांची खरेदी केली. त्यानंतर संबंधित मेडिकलमध्ये छापा टाकून कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात संबंधित मेडिकल चालकांकडे औषध विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही समोर आले आहे. पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात येत आहे.दरम्यान, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशा प्रकारच्या नशा निर्माण करणाऱ्या औषधांची विक्री करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!