पहिली घटना इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सहस्त्रकुंड वाळकी बुद्रुक (ता. किनवट) येथे राहणारे फिर्यादी शिला शंकरराव वाळकीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सतीश बाबुराव सकवान (रा. इस्लापूर) याने फिर्यादीचे सुमारे १८ तोळे ४ ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत अंदाजे ५ लाख ७० हजार ४०० रुपये, परस्पर विकून विश्वासघात करत फसवणूक केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी महिला पोलीस उप निरीक्षक कांगणे करत आहेत.
दुसरी घटना वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. गुजराती हायस्कूलजवळ राहणाऱ्या अपूर्वा कैलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संतोषसिंग चंदेल (रा. गोविंदनगर, नांदेड) याने शेअर मार्केटमध्ये जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केली. पैसे परत न करता विश्वासघात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३१/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे हे करत आहेत.
तिसरी घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एमआयडीसी परिसरात बनावट सीलिंग फॅन विक्रीचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी अनुप संभाजी कोलप (वय ४९), हे आयपी इन्व्हेस्टिगेशन सर्व्हिस प्रा. लि., मुंबई येथे कार्यरत असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सागर उत्तमराव सूर्यवंशी (रा. संतोषनगर, तरोडा) व धीरज सेल्स अँड एजन्सीच्या मालकांनी CROMPTON BRISK AIR NEO VENTILATING FAN नावाचे बनावट बॉक्स तयार करून कंपनीच्या नावाचा गैरवापर केला. त्यामुळे कंपनी व ग्राहकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७९/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) सोबतच कॉपीराइट कायदा व व्यापार चिन्ह अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार जाधव करत आहेत.
