अहमदपूर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अहमदपूर येथे मोठी कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा परिसरातील एका बारच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ९ जणांना ताब्यात घेतले.
ही कारवाई ८ मे २०२६ रोजी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी टिटर’ नावाचा जुगार सुरू होता. त्यानुसार विशेष पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत छापा टाकला असता, तेथे ९ जण जुगार खेळताना आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ५८ हजार ५०० रुपये रोख रक्कम, ७७ हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल फोन तसेच २ लाख १० हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकली असा एकूण ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८०/२०२६ नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अहमदपूर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रकाश चिमनडे हे करीत आहेत.
सदर कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,संजीव जिंकलवाड,गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या या धाडसी आणि उल्लेखनीय कारवाईबद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले.
दरम्यान, अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलिस विभागाने ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी, असे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
