नांदेड(प्रतिनिधी)-आंबाळा ता.हदगाव येथे 2 भिन्न जातीच्या समाजामध्ये भांडण प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी रात्रभर मेहनत करून दोन्ही गुन्ह्यातील जवळपास 15 आरोपी अटक केले आहेत. त्यामुळे हे भांडण मर्यादीत राहिले.
दि.22 मार्च रोजी मौजे आंबाळा ता.हदगाव येथे दोन समाजात भांडण झाले.त्यात सुनिता चंपतराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रात्री 8 वाजेच्यासुमारास लहान मुलांचा वाद ऐकून आल्यानंतर मी आणि माझे पती बाहेर आलो तेंव्हा त्यांच्या मुलाला दहा ते बारा जणांचे टोळके मारत होते. आम्ही त्यात हस्तक्षेप केल्यानंतर आमच्या घरात घुसून मला, माझा मुलगा साईनाथ, माझे पती चंपतराव यांना मारहाण करून घरात ठेवलेेले 50 हजार रुपये रोख रक्कम, माझ्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन आणि माझ्या गळ्यातील शॉर्ट गंठन असा 2 लाख 50 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. या तक्रारीमध्ये अजय गजभारे, संजय भिमराव रणविर, स्वप्नील लंकेश नरवाडे, लखन देवराव खिल्लारे, अक्षय विश्र्वंभर कोकरे, करण गौतम खिल्लारे, निलेश नागोराव खिल्लारे व इतर अनेक जण असा आरोपींचा उल्लेख आहे. हदगाव पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 395, 294, 452, 427, 323, 504 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 80/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगन पवार हे करणार आहेत.
या तक्रारीच्या परस्पर विरोधी तक्रार संजय भिमराव रणविर यांनी दिलेली असून आम्ही 22 तारखेला रात्री 8.30 वाजता पुढच्या महिन्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची वर्गणी जमा करत असतांना आमच्या गावातील गजानन मारोतराव पवार, चंद्रकांत शिवाजी पवार, मनोज धरणे, रवि माधवराव पवार, चंपत पवार, साईनाथ चंपत पवार या सर्वांनी जातीवाचक शिवीगाळ करून आमच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि माझ्या खिशातील डॉ.आंबेडकर जयंती निमित्त जमा करण्यात आलेल्या पट्ठीतील 3340 रुपये बळजबरीने काढून घेतले आहेत. या तक्रारीवरुन हदगाव पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 395, 326, 323 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनिमयच्या कलम 3(1)(आर), 3(एस), 3(2)(व्ही.ए.) नुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक डॅनिएन बेन यांच्याकडे देण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, पोलीस उपअधिक्षक डॅनिएन बेन, हदगावचे पोलीस निरिक्षक जगन पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक मांटे, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, रायबोळे, पोलीस अंमलदार चिंतले, राजपाल डुकरे, सतिश केंद्रे, रुपेश मस्के, स्वप्ना सुर्यवंशी, गायकवाड आणि वाडकर यांच्यासह सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर मेहनत करून जवळपास दोन्ही गटातील मिळून 15 आरोपी अटक केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. सध्या अंबाळा येथे तणावपुर्ण शांतता आहे. पोलीसांनी आंबाळा गावात चोख बंदोबस्त ठेवला आहे.