नांदेड,(जिमाका)- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ४८ व ४९ व्या ग्रंथ भेट योजनेंतर्गत ग्रंथांच्या खरेदीसाठी सन २०२१ व सन २०२२ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त ग्रंथांपैकी निवड केलेल्या मराठी ४८५, हिंदी २०४ व इंग्रजी २२१ अशा एकूण ९१० ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. या ग्रंथांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या https://htedu.maharashtra.gov.in/maim/ या संकेतस्थळावर १८ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान ३० टक्के सूट दराने वा त्यापेक्षा अधिक सूट दर देण्यास तयार असल्यास त्या सूट दराप्रमाणे ग्रंथांचा पुरवठा करणे आवश्यक राहील. याबाबत प्रकाशक, वितरकांनी देयकात स्पष्टपणे नमूद करावे.
या संदर्भात यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती, आक्षेप असल्यास ३० मार्च २०२४ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगरभवन, मुंबई- ०१ यांच्याकडे लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्त बटवड्याने, टपालाने किंवा ई- मेलवर मुदतीत पाठवावेत. त्यानंतर आलेल्या सूचना, हरकती आणि आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. तसेच यादीत ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक, किमतीत काही बदल असल्यास निदर्शनास आणून द्यावे, असे अशोक मा. गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.