नांदेडसारख्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराच्या विकासात नगरसेवकांची भूमिका अधिक जबाबदारीची ठरते. रस्ते, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, स्वच्छता, स्ट्रीट लाईट्स यांसारख्या मूलभूत सुविधांसोबतच शहरात येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हीसुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, विकासनिधी आणणे, नवे प्रकल्प राबवणे आणि शहराच्या प्रगतीला गती देणे या सर्व बाबी नगरसेवकांच्या कार्यक्षेत्रात येतात.
परंतु अत्यंत खेदाची बाब म्हणजे, जगभरातील श्रद्धाळूंचे आकर्षण असलेला गुरुद्वारा परिसर आजही अनेक मूलभूत समस्यांनी ग्रस्त आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक नांदेडला येतात, त्यामुळे हा परिसर शहराच्या प्रतिमेचा आणि अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. तरीदेखील अपेक्षित विकास या भागात दिसून येत नाही.
वारंवार होणारी वीज खंडित होणे, रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचा वावर, अपुरी स्ट्रीट लाईट व्यवस्था, तसेच स्वच्छतेचा अभाव या समस्या नागरिकांसोबतच भाविकांनाही त्रासदायक ठरत आहेत. याशिवाय, गुरुद्वारा परिसरातील प्रत्येक चौकाचे सुशोभीकरण करणे, व्यवस्थित वाहतूक व्यवस्था उभी करणे आणि मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांसाठी पुरेशी व नियोजित पार्किंग व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत या महत्त्वाच्या बाबींवर अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
एका बाजूला शहराच्या विकासाच्या मोठ्या घोषणा केल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला गुरुद्वारा परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या जमिनींवरील आरक्षण, शासकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय नियंत्रण यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळण्याऐवजी अडथळे निर्माण होत आहेत. सामाजिक माध्यमांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या चर्चा, मौल्यवान जमिनी कमी भाड्याने देण्याचे आरोप आणि सुविधांच्या अभावामुळे या पवित्र स्थळाची प्रतिमा मलिन होत आहे.
नांदेडचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर गुरुद्वारा परिसराचा विकास हा प्राधान्यक्रमावर असणे अत्यावश्यक आहे. चौकांचे आकर्षक व सुबक सुशोभीकरण, सुलभ व सुरक्षित वाहतूक नियोजन, तसेच प्रशस्त व व्यवस्थित पार्किंग सुविधा या गोष्टी केवळ सुविधा नसून शहराच्या आधुनिकतेचे प्रतीक आहेत. यामुळे भाविकांचा अनुभव सुधारेल, शहराची ओळख उंचावेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
आज गरज आहे अशा कार्यक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या नगरसेवकांची, जे केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष काम करून दाखवतील. जे नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवतील, विकासनिधी प्रभावीपणे वापरतील आणि नांदेडला स्वच्छ, सुंदर, सुसज्ज आणि प्रगत शहर बनवण्यासाठी कटिबद्ध राहतील.
नांदेडचा विकास हा केवळ घोषणांमध्ये नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे. गुरुद्वारा परिसराचा विकास म्हणजे नांदेडच्या प्रतिष्ठेचा विकास , येणाऱ्या यात्रेकरू मुळे अनेकांना रोजगार, महानगरपालिका व प्रशासनला गुरूद्वारा बोर्ड कडून भरपूर प्रमाणात महसूल, नवीन नवीन मार्केट मुळे व्यापाऱ्यांना चांगला रोजगार उपलब्ध हे सर्व फायदे मिळण्याची संधी देश विदेशातील शीख समाजाच्या उद्योजकांना प्रेरीत केल्यास मोठ मोठ्या उद्योगां करीता गुंतवणूक करण्याची उमेद आणि ही जबाबदारी आता सर्वांनी मिळून पार पाडण्याची वेळ आली आहे.
