नांदेड – नांदेड जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव असलेल्या नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी सूचना अंदाज समितीचे सदस्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अंदाज समितीच्या बैठकीत शुक्रवारी केली.
नांदेड जिल्ह्याचे प्राचीन वैभव असलेला नंदगिरी किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर होता. गडप्रेमी असलेले अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी किल्लेदारांची फौज तयार करून गेल्या तीन वर्षापासून दर रविवारी मोहिमा राबवून किल्ला प्रकाश झोतात आणून शासनाचे लक्ष केंद्रित केले.नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी शासनाने सहा कोटी २९ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्या निधीतून आता विकास कामे सुरू आहेत.
मागील आठवड्यात किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नंदगिरी किल्ला येथे शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी, पुरातन शस्त्र, आयुधे यांचे तीन दिवसीय अभिनव प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनाचा हजारो नांदेडकरांनी व आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांनी लाभ घेतला.
अंदाज समितीचे अध्यक्ष सदस्य यांनी नुकताच नांदेड जिल्ह्याचा दौरा केला.या दौऱ्यात व्यस्त असताना देखील अंदाज समितीचे सदस्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आवर्जून शुक्रवारी नंदगिरी किल्ला येथे सकाळी भेट दिली. गोदावरी नदीकाठच्या संपूर्ण किल्ल्याची पाहणी करून सविस्तर माहिती व ईतिहास जाणून घेतला.नंदगिरीच्या किल्लेदारांच्या कामाचे कौतुक केले.
नांदेडचे वैभव व प्राचीन ठेवा असलेल्या नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी डिपीडीसी मधून अजून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी सूचना अंदाज समितीचे सदस्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अंदाज समितीच्या बैठकीत केली.
नंदगिरी किल्ला भेटीच्या वेळी सदाभाऊ खोत यांच्यासोबत मनपाचे लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे,जयेश भरणे,सागर ढालकरी,आदित्य नागेश्वर,सोनू टाक आदी नंदगिरीचे किल्लेदार उपस्थित होते.

