तिहेरी खून प्रकरण; दोन पोलीस अंमलदार निलंबित

नांदेड (प्रतिनिधी) : भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत ४ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना वजिराबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याला पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथे हलविण्यात आले.

जखमीस रुग्णालयात नेत असताना रुग्णालय परिसरातच एका व्यक्तीकडून पुन्हा धारदार शस्त्राने हल्ला झाला. त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अपेक्षित तत्परता व दक्षता न दाखवल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले.

या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम २५ अनुसार दोन अंमलदारांना निलंबित केले आहे. निलंबित अंमलदार
1. सपोउपिनि ५१३२ आनंदराव राठोड, नेमणूक – पोलीस ठाणे भाग्यनगर
2. सपोउपिनि  ५२१५ नागेश वाडीयार, नेमणूक –  पोलीस ठाणे भाग्यनगर
संबंधित पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, विष्णुपुरी रुग्णालयातील सुरक्षा गार्ड MESCO Security Staff Incharge यांच्याविरुद्धही शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे. सदर प्रकरणी विभागीय चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!