धर्माबाद (प्रतिनिधी) – बाचेनगाव (ता. धर्माबाद) येथे 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक पदाच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी दत्ता चंदर पोटफोडे यांनी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतमार्फत केलेल्या बांधकाम कामगारास मागील वर्षभरातील जास्त दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून ग्रामपंचायत कार्यालय करखेली तसेच ग्रामसेवक पदासाठी बनावट शिफारसपत्र व खोटी सही तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी लोकांकडून तब्बल 18,000 रुपये घेतल्याची तक्रार दाखल झाली आहे.
तक्रारदार प्रकाश बाबाराव पवार (वय 51), व्यवसाय – नोकरी, ग्रामसेवक ग्रामपंचायत करखेली यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 76/2026 अन्वये कलम 318(4), 336(3), 341(2) बीएनएस–2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंमलदार लोणेकर हे करीत आहेत.
